दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रूपये जमा होणार आहेत. या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना काही कारणास्तव पीएम किसानच्या १९ वा हप्त्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
'या' शेतकऱ्यांचा १९ वा हप्ता अडकू शकतो
• जमीन पडताळणी आवश्यक
एकीकडे ९.७ कोटी शेतकऱ्यांना यावेळी १९ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, तर दुसरीकडे असे अनेक शेतकरी आहेत जे हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. यामध्ये पहिले असे शेतकरी आहेत ज्यांनी जमीन पडताळणीचे काम केलेले नाही किंवा हे काम अपूर्ण आहे.
• ई-केवायसी
दुसरे म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही त्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित ठेवले जाईल. हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, असे विभागाकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात होते. तुम्ही हे काम तुमच्या जवळच्या CSC केंद्रावरून किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वरून करू शकता, परंतु जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला हप्त्याच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जाईल.
• बँक खात्याला आधार लिंक बंधनकारक
ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंकिंगचे काम पूर्ण केलेले नाही त्यांचे हप्तेही अडकतील. यामध्ये, तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल. याशिवाय, तुमच्या बँक खात्यात DBT पर्याय देखील सक्षम असणे आवश्यक आहे कारण जर तो सक्षम केला नाही तर तुम्ही हप्त्याच्या फायद्यांपासून वंचित राहाल.