Advertisement

बीडमध्ये कोट्यवधींचा सुवर्ण घोटाळा!

प्रजापत्र | Tuesday, 11/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१०(प्रतिनिधी): अगोदरच वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असलेल्या आणि मल्टिस्टेटने गंडविलेल्या बीड जिल्ह्यात आता वेगळाच सोने घोटाळा समोर आला आहे. बीडमधील एका ‘विलासी’ व्यक्तीने बीड शहरातील अनरेक व्यापार्‍यांना ‘तुम्हाला मुंबई भावाने सोने देतो’ म्हणत त्यांना चक्क सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची बिस्किटे देऊन पोबारा केला आहे . हा विक्रेता असा ‘उदा’र’वंत’ बनून आता गायब झाल्याने अनेकांना डोके धरून बसण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे सोने घेणारांनी देखील ते नंबर दोनचे म्हणूनच घेतले, त्यामुळे आता गंडवले गेल्यानंतरही त्याबद्दल कोठे बोलण्याची सोय नसल्याची परिस्थिती  असल्याने त्यांची अवस्था ‘हाक ना बोंब’ अशी झाली आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या काही वर्षात अनेक घोटाळे  समोर आले आहेत . जिल्ह्यातील लाखो लोकांना अगोदरच काही मल्टिस्टेटवाल्यानी गंडा घातला आहे. त्यामुळे बाजारपेठेला मोठा फटका बसलेला आहे. असे असतानाच आता शहरातील बड्या व्यापार्‍यांसह अनेकांना सोन्याच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर येत आहे. बीडमध्ये सोन्याचा व्यापार करणार्‍या एका ’विलासी ’ व्यक्तीने अनेकांना ’तुम्हाला मुंबईच्या भावात सोने देतो ’ म्हणून भुरळ घातली. त्याने सुरुवातीला काही लोकांना सोने दिले देखील. हा व्यक्ती इतका ”उदा’र’वंत’ होता, की त्याने दिलेल्या सोन्यावर एका वित्तीय संस्थेने गोल्डलोन सुद्धा दिले. त्यामुळे बीडच्या बाजारपेठेत त्याची चांगलीच चर्चा होती. जीएसटीची कटकट नको,कोणते कागदपत्र नको म्हणून अनेक मोठ्या व्यापार्‍यांनी मग या ’विलासी ’ ’उदा’र’वंत’ व्यक्तीकडून मोठ्याप्रमाणावर सोन्याची बिस्किटे खरेदी केली. कोणी दोन, कोणी पाच तर ज्याला जशी जमतील तशी बिस्किटे, सोने यांच्याकडून खरेदी करण्यात आले आहे. आता त्याने दिलेले सोनेच चक्क बनावट असल्याचे सांगितले जात आहे. जी बिस्किटे सोन्याची म्हणून देण्यात आली, ती प्रत्यक्षात तांब्याची असून त्याला केवळ सोन्याचा मुलामा दिलेला असल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे या सार्‍या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे सर्वांनाच समजले आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून तो ‘विलासी’ व्यक्ती बीडसोडून गेला असून त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहित नाही. त्यामुळे आता बोलायचे तरी कोणाला हा प्रश्‍न व्यापार्‍यांना देखील पडला आहे. विशेष म्हणजे हा सारा मामला नंबर दोनचा, त्यामुळे ना बिले ना पावत्या, दाद मागायची तरी कशी आणि कोठे ? हे सारे पैसे अर्थातच सरकारपासून लपविले, त्यामुळे तक्रार करायला जावे तर नवीनच खेंगटे मागे लागायचे त्यामुळे या फसवणुकीवर कोणी मोकळेपणाने बोलायला देखील तयार नाही.

 

घ्यायचा अत्यल्प मजुरी
हा 'विलासी' 'उदा'र'वंत' सोन्याच्या कामावर मजुरी देखील अत्यल्प घ्यायचा. ज्यावेळी बाजारपेठेत एका ग्रामसाठी किमान ५०० रुपये मजुरी आकारली जायची, त्यावेळी हा चक्क ग्राम साठी १०० रुपये इतकीच मजुरी आकारायचा असेही सांगितले जाते. त्यामुळे देखील त्याच्याकडे अनेकांचा ओढा होता. आता त्याने असे कोणाकोणाला गंडविले आहे आणि त्याने दिलेले दागिने नेमके कशाचे आहेत हे देखील ज्याचे त्याने तपासावे .

 

 

एक वित्तीय संस्था देखील अडचणीत
मिळालेल्या माहितीनुसार सदरचा व्यक्ती हा एका सार्वजनिक क्षेत्रातील  वित्तीय संस्थेच्या पॅनलवर होता. त्याच्या प्रमाणपत्राआधारे सदर वित्तीय संस्था गोल्डलोन द्यायची. आता त्या संस्थेने दिलेल्या गोल्डलोन मध्ये देखील काही कर्जदारांनी असेच बनावट सोने त्या संस्थेला दिले असल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती गायब झाल्यापासून त्या वित्तीय संस्थेने देखील आपल्याकडील सर्वच कर्जदारांच्या सोन्याची तपासणी सुरु केली असून अनेकांना कर्जाऊ घेतलेली रक्कम तात्काळ भरा असा तगादा लावला असल्याची माहिती आहे
.

Advertisement

Advertisement