उदगीर- तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या वाढवणा गावातील प्रतिष्ठित व्यापारी इसाक हवालदार यांच्या कन्येच्या शुभविवाह प्रसंगासाठी उदगीर, लातूर आणि औशाहुन जवळपास दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित राहिले होते. या विवाह समारंभासाठी दस्तुरखुद्द राज्यमंत्री संजय बनसोडे ही हजर होते. प्रमुख अतिथी म्हणून त्यांचा यथोचित सत्कार या कार्यक्रमात झाला. या लग्नसमारंभात उपस्थित असलेल्या आबालवृद्धांनी मेजवानीचा आनंद घेतला. मात्र या लग्नसमारंभात भोजनाचा आनंद घेतलेल्या जवळपास दोनशेहून अधिक लोकांना अन्न विषबाधा झाल्याने ते वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार वाढवणा येथील शासकीय रुग्णालय तसेच सेवा क्लीनिक, अथर्व क्लिनिक यांच्यासोबतच हाळी आणि काही प्रमाणात उदगीर येथील शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात अन्न विषबाधा झालेल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले आहे. वाढवणा येथील व्यापारी इसाक हवालदार यांच्या मुलीच्या लग्नसमारंभासाठी जिल्हाभरातून अनेक मान्यवर हजर झाले होते. या लग्नसमारंभासाठी मोठ्या प्रमाणात तयारीही करण्यात आली होती. शासकीय रुग्णालयाच्या बाजूलाच हा विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर काही बालकांना उलट्या संडास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बालकांच्या पाठोपाठ इतरही अनेकांना अन्न विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोक वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झाले. वाढवणा गावातील दवाखान्यांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांनी जवळपासचे हळी हंडरगुळी, उदगीर येथील त्यांच्या परिचित असलेल्या खाजगी रुग्णालयात रुग्णांना दाखल केले. जे गंभीर स्वरूपातील बालक होते असे तीन ते चार बालकांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमच्या प्रतिनिधीच्या सांगण्यानुसार बातमी लिहीपर्यंत संख्या वाढत असल्याची माहिती हाती आली आहे.
आम्ही गंभीर बालकांना तात्काळ उदगीर येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे
आमच्या पातळीवरून आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. वाढवणा शासकीय रुग्णालयात दाखल असलेला एकही रुग्ण गंभीर स्वरूपाचा नाही.किंवा त्यांच्या जीवाला धोका नाही.
डॉ.वर्षा कानकाटे