Advertisement

संपादकीय अग्रलेख -ही आहे बीडची ओळख

प्रजापत्र | Thursday, 23/01/2025
बातमी शेअर करा

मागच्या एक दिड महिन्यापासून जिल्ह्याची चर्चा होतेय ती केवळ वाईट अंगानेच, बीड म्हणजे दहशतीचे केंद्र असे काहीसे चित्र राज्यभरात निर्माण झाले आहे. मात्र हे सारे होत असताना बीडचे नाव अभिमानाने घ्यावे अशा काही घटनाही घडल्या. बीडच्या प्रतीक्षा इंगळे हिच्या कर्णधारपदाखाली भारताने खोखोचा विश्वचषक जिंकला. बीडच्याच दामिनी देशमुखची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. असे अभिमान वाटावे असे प्रसंग अजूनही आहेतच, त्याची चर्चा होणार कधी? खरेतर अशांचे अभिनंदन होऊन ही बीडची ओळख म्हणून समोर यायला हवे.
 

    बीड जिल्हा हा राज्यातला खऱ्या संघर्ष शिकविणारा, मेहनत शिकविणारा जिल्हा होता. तीच बीडची ओळख होती. अध्यात्मिक संप्रदायात विविध संतांच्या विचारांनी पुनीत झालेला जिल्हा अशीच बीडची ओळख होती. मात्र मागच्या काही काळात विकासाच्या संकल्पनेवर सारे चेहरे रंगविले जाऊ लागले आणि बीड जिल्हा म्हणजे मागास जिल्हा, ऊसतोड कामगार पुरविणारा जिल्हा अशी ओळख बिडकर म्हणून आम्ही आणि आमचे लोकप्रतिनिधीच मिरवू लागले. ऊसतोड कामगार पुरविणारा जिल्हा हे बीडचे एक अंग आहे, नाही असे नाही, मात्र केवळ तीच बीडची ओळख नव्हती.
   आता तर मागच्या एक दिड महिन्यापासून बीडची ओळख बाहेर सांगू नये असे वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. संतोष देशमुख यांची झालेली हत्या नक्कीच नृशंस म्हणावी अशीच आहे, आणि त्याचा निषेध झालाच पाहिजे, पण केवळ तीच बीडची ओळख नाही. या हत्याकांडानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही बीडमध्ये अराजक सुरु असल्याचे सांगितले. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने काही प्रश्न निश्चितच आहेत, त्याची प्रभावी सोडवणूक झालीच पाहिजे, मात्र त्यासाठी केवळ बीड फार वाईट आहे म्हणून भागणार नाही. आजच्या घडीला बीडच्या लोकांना बाहेर कोणी खोलीही द्यायला तयार नाही अशी परिस्थिती या साऱ्या गोष्टींमुळे निर्माण झाली आहे. बीडमध्ये वाळू माफिया आहेत असे सांगून मुख्यमंत्री मोकळे झाले, मात्र आता त्यांचेच राधाकृष्ण विखेंसारखे मंत्री वाळूच्या गाड्यांबद्दल 'चालू द्या, ते आपलेच आहेत' असे जाहीरपणे बोलत असतील तर एकटे बीडचा राज्यात वेगळे आहे असे कसे म्हणता येईल? एक बिडकर म्हणून आता आपला कोणता चेहरा प्रकर्षाने समोर आणायचा याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे.
      मागच्या महिनाभरापासून राज्याच्या वेगवेगळ्या भागातील लोक बीड बद्दल केवळ आणि केवळ वाईट तेच काय ते जगासमोर सांगत आहेत. ज्यांना बीडकरांच्या वेदनांशी फार काही देणेघेणे असते हे कधी जाणवले नाही, बीड जिल्ह्यात दुष्काळ असताना राज्याच्या इतर भागांमधून कधी इकडे मदतीचा ओघ वाहू द्यावा यासाठी ज्यांनी कधी प्रयत्न केले नाहीत, बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी कधी ज्यांची जीभ उचलली नाही अशा अंजली दमानिया, तृप्ती देसाई यांना बीडची वाईट बाजू सांगताना मात्र किती बोलू आणि किती नको असे होते, हे साऱ्या राज्याने अनुभवले आहेच. त्यांचे ठीक आहे, त्यांना बीडचे चांगुलपण कदाचित पाहायचेच नाही, कारण त्यासाठी त्यांना कोणी माध्यमांमध्ये चर्चेला बोलावणार नाही, पण बीडकर म्हणून आपल्याला काही गोष्टींचा विसर पडून कसे चालेल? खोखोच्या विश्वचषकामध्ये देशाला विजेतेपद मिळाले, या संघाची कर्णधार असलेली प्रतीक्षा इंगळे बीड जिल्ह्यातील आहे,देशपातळीवर बीडचं नाव झळकविणारा अविनाश साबळे देखील बीड जिल्ह्यातीलच.ही बीडची ओळख होत नाही का? देशपातळीवर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला फार महत्व असते, त्यासाठी बीड जिल्ह्याच्या देवडीची कन्या असलेल्या दामिनी देशमुखची निवड झाली, राष्ट्रीय पातळीवरील शूटिंग स्पर्धेत व्यवसायाने अभियंता असलेल्या संध्या फरताडे यांनी यश मिळविले, त्या देखील बीडच्याच. मागच्या अवघ्या काही दिवसातील या घटना, बाकी इतिहासात जाऊन सांगायचे तर अनेक गोष्टी आहेतच.नुकतंच साखर उद्योगातील मानाचा मानला जाणारा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा व्यवस्थापनामधील दुसरा पुरस्कार माजलगावच्या छत्रपती साखर कारखान्याला मिळाला,मल्टीस्टेट मध्ये अनेक गोष्टी घडत असतानाही मंगलनाथ परिवार, किंवा तुळजाभवानी परिवाराने आपले एक नाव टिकविले आहे, ते देखील बीडचेच, रेशीम उद्योगात नेकनुरसारख्या ठिकाणी समृद्धी सरिकल्चरच्या माध्यमातून काम करणारे थोरात दाम्पत्य बीडचेच. बाकी शेती क्षेत्रातील वेगवेगळे प्रयोग करणारे असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे संतोष गर्जे, दीपक नागरगोजे, दत्ता बारगजे हे चेहरे बीडचेच. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून सामूहिक विवाहाची चळवळ राबविलेले बाळू ताकट हे बीडचेच, मानवलोक संस्था देखील बीडचं,शासकीय अनुदानापलीकडे जाऊन महिलांमध्ये नवचेतना जागवत हजारो महिलांना बचतगटांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून दिलेल्या मनीषा घुले बीड जिल्ह्याच्याच. इतर कोणी बोलतील का नाही माहित नाही, मात्र बीडकरांनी तरी आपल्या जिल्ह्याची खरी ओळख ही आहे हे आता सांगायला हवे, चर्चा याच्या व्हायला हव्यात.
 

Advertisement

Advertisement