Advertisement

मंत्रालयातील धक्कादायक प्रकार 

प्रजापत्र | Sunday, 24/01/2021
बातमी शेअर करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर बदल केल्याचा धक्कादायक प्रकार मंत्रालयात समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला चौकशीचा आदेश परस्पर रद्द करण्यासाठी केलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र फाईलमधील मजकूरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदल करण्यात आला. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर या फाईलमधील मजकूरामध्ये परस्पर बदल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर स्वाक्षरीच्या वरील भागामध्ये लाल शाईने एक दुसरा मजकूर लिहण्यात आला. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी असेही लिहिण्यात आले होते. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांची परवानगी अंतिम असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी ही महत्त्वाची असते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर थेट मजकुरच बदलण्याचे धाडस कुणी केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फाईलमध्ये कोणत्या अभियंत्याचे नाव?
शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामात अनियमितता झाल्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार हे त्यावेळी कार्यकारी अभियंता होते. आता त्यांच्या फाईलमध्ये हा फेरफार करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Advertisement

Advertisement