केज दि.१३ (प्रतिनिधी) - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ३५ दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप एक आरोपी फरार असून या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याला अद्याप खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी न केल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त करत आपण मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा काल दिला होता. त्यामुळे आज मस्साजोगमधील दोन्ही मोबाइल टॉवरभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. त्यामुळे धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याची टाकी गाठली आणि त्यावर चढून सध्या देशमुख यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी घेण्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांची अतिशय निर्दयपणे व क्रूरतेने हत्या करण्यात आली. त्याला ३५ दिवस झाले, तरीही कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही मोकाटच आहे. तसंच इतर आरोपींच्या मोबाइलचे सीडीआर काढले का?, संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी कॉल व व्हिडीओ कॉल कोणाला केले? सरपंच देशमुख खून प्रकरणाच्या तपासाबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही. खंडणी ते खून प्रकरणातून कोणाला तरी वाचवण्यात येतेय काय?, अशी शंका आपल्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोपी सुटले, तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबीयांना संपविण्यात येणार आहे. त्यामुळे आम्हीच टॉवरवर चढून वरून खाली उडी मारून आपले जीवन संपवण्याचा निर्णय गंभीर्यपूर्वक व विचारपूर्वक घेतल्याचे धनंजय देशमुख यांनी काल सांगितले होते.