सातत्याने विरोधी पक्षात बसणे आजच्या राजकारणात तसे सोपे राहिलेले नाही. त्यातही जे कॉंग्रेस संस्कृतीमध्ये वाढले आहेत, त्यांच्यासाठी तर ते अधिकच अवघड. म्हणूनच आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील अनेक लोक अजित पवार गटाच्या नेत्यांना पुष्पगुच्छ देत असतात. एकदा सत्तेचा संसर्ग झालेला असेल की मग सत्ते शिवाय राहता येत नसते ही आगतिकताच यातून ध्वनीत होत आहे.
लोकसभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर खरेतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आशा अधिकच पल्लवित झाल्या होत्या. कदाचित लोकसभेतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाकडे पाहूनच विधानसभा निवडणूकीच्या अगोदर शरद पवार गटाची किंमतही वाढली होती. पण विधानसभा निवडणुकीत राजकारणाने पुन्हा वेगळे वळण घेतले आणि महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला. त्याचा मोठा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही बसला. आता त्या पराभवाची कारणे काहीही सांगितली जात असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नजीकच्या भविष्यात सत्ता येणार नाही आणि महायुती सत्तेवर आहे, अजित पवार सत्तेत खुप काही देऊ शकण्याच्या भूमिकेत आहेत हे किमान आजचे तरी वास्तव आहे. आणि कदाचित त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे असा सुर देखील जाणिवपूर्वक लावला जात आहे.
मुळात शरद पवारांची राष्ट्रवादी काय किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काय, यात कॉंग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेल्या नेत्यांचा किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा भरणा आहे आणि या घराण्यांना तशी विरोधात बसण्याची सवय नाही. दिर्घकाळ विरोधी पक्षाचे राजकारण या नेत्यांच्या डीएनए मध्येच मुळातच नाही. काही अपवादात्मक परिस्थितीत विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तरी पाण्याविना मासा जसा तडफडतो, तसे हे लोक सत्तेसाठी तडफडत असतात. त्यामुळेच आता आणखी किमान साडेचार वर्ष विरोधीपक्षात कशी काढायची? उद्या भविष्यात काही चमत्कार घडला आणि पुढच्या निवडणुकीत कदाचित सत्ता येईल असे गृहीत धरले तरी विरोधीपक्षात राहून त्यावेळी आपण निवडुण येऊ का? असा प्रश्न आज महाविकास आघाडीमधील अनेकांना आहेच, आणि त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील अनेकांना अजीत पवारांसोबत जायचे आहे. भलेही मंत्री पदाची झुल नाही पण सत्तेच्या गरमीला तरी रहाता येईल हा त्यातला व्यवहारी विचार आहे.
बरे हे जे कोणी अजीत पवारांसोबत जाऊ इच्छिणारे नेते आहेत, त्यांना ते कुठेही राहिले तरी फार मोठी संघटनात्मक किंवा संवैधानिक पदे मिळण्याची अशीही अपेक्षा नाही. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहीत पवार, जितेंद्र आव्हाड, रोहीत पाटील, महेबुब शेख यांच्यासारख्यांना किमान राजकीय उंची, राजकीय मतभेद, विचारधारा आणि सामाजिक राजकारण यांच्या अडचणी आहेत, पण इतरांच्या बाबतीत या साऱ्या अडचणी तितक्याशा लागू होत नाहीत. त्यामुळे या नेत्यांना जरी एकी च्या प्रयत्नात फारसा रस नसला तरी इतर सर्वांना तसेच वाटण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे देखील जयंत पाटलांनी कितीही कान टोचले किंवा आदळआपट केली तरी सत्ताआगतिकांना ते किती काळ रोखू शकतील हा प्रश्नच आहे.