Advertisement

पुरोगामी महाराष्ट्रात मस्साजोग सारख्या घटना दुर्दैवी - शरद पवार

प्रजापत्र | Saturday, 21/12/2024
बातमी शेअर करा

केज दि.२१ - पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी होऊन यामध्ये जे दोषी असतील त्यांना कडक शासन होणे गरजेचे आहे. असे स्पष्ट मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी मसाजोग येथील देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
          केज तालुक्यातील मस्साजोग येथील युवा सरपंचाची निर्घृणपणे हत्या होऊन बारा दिवस उलटून गेले आहेत. संपूर्ण राज्यामध्ये या घटनेचे पडसाद उमटत आहेत. यातील काही आरोपी पोलिसांनी अटक केलेली आहेत परंतु उर्वरित आरोपी आणखीही पोलिसांच्या हाती सापडलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते मस्साजोग येथे भेट देऊन देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करत आहेत. आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत दोषींना कडक शासन करण्याची भूमिका मांडत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मसाजोग येथे शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब असल्याचे बोलून दाखवले. उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यातील दोषींना कडक शासन होईल असे प्रयत्न करावेत. एवढेच नव्हे तर संतोष देशमुख यांच्या यांच्या मुलांच्या शिक्षणाची ही जबाबदारी आम्ही घेत असल्याचे यावेळी बोलून दाखवले. आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही सर्वजण मिळून आधार देत आम्ही खंबीरपणे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभे असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement