Advertisement

  सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक

प्रजापत्र | Tuesday, 10/12/2024
बातमी शेअर करा

 केज दि.१०(प्रतिनिधी)- तालुक्यातील (Kej)मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) असे सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला. यानंतर मृताचे नातेवाईक संतप्त झाले असून अहमदनगर -अहमदपूर महामार्गावर (Ahmadnagar Ahmedpur Highway) रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. 
  
 अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता.मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. 

 

 

मृताचे नातेवाईक आक्रमक
संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते. त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणी अहमदनगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको केला जात आहे. मृताचे नातेवाईक संतप्त झाले असून रास्ता रोको करत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली जातेय. रास्ता रोकोच्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दाखल झाले असून नातेवाईकांची समजूत काढली जात आहे.

Advertisement

Advertisement