केंद्रीय नेतृत्व घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी भूमिका घेणे ही महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची राजकीय अपरिहार्यता होती. त्यानुसारच दोन दिवस उशिरा का होईना, त्यांनी हे शहाणपण दाखविले. महाराष्ट्रात भाजपला मिळालेले मोठे यश आणि एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत न पाहण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची इच्छा यामुळे देखील एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंगची शक्ती अशीही संपली होतीच , आता त्यांनी शहाणपणाने माघार घेतली हे बरेच झाले.
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी खरेतर भाजप त्यांना मुख्यमंत्री करेल असे कोणाला वाटत नव्हते, पण भाजपने तो अनेपक्षित धक्का सर्वांनाच दिला होता, अगदी देवेंद्र फडणवीसांना देखील. त्यावेळी भाजपची राजकीय गरज वेगळी होती. त्यांना एका राज्याच्या मुख्यमंत्रीपदापेक्षाही कसेही करून उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता , तसेच आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हा संदेश देखील द्यायचा होता . नंतरच्या काळात लोकभेच्या निवडणुका होत्या, त्यामुळेही भाजप मित्रपक्षांना जपतो हे दाखविण्यासाठी का असेना भाजपला एकनाथ शिंदे हवेच होते . त्यातही मराठा आरक्षण आंदोलन एका वेगळ्या वळणावर असताना मराठा चेहरा देणे ही भाजपची आवश्यकता होती, याचा अर्थ त्यांना एकनाथ शिंदे फार प्रिय होते असे नाही. म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा जेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न आला, त्यावेळी भाजपने ते आम्ही एकत्र बसून ठरवू अशीच भूमिका घेतली होती. निवडणुकीदरम्यान कधीही भाजपने एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे सांगितले नव्हते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने तर सारेच चित्र पालटले आहे . भाजपला एकट्यालाच इतक्या जागा मिळाल्या आहेत, की जर स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करायचे भाजपला फार काही अडचणी येतील अशी परिस्थिती नाही. अशावेळी भाजपचं काय, कोणताच पक्ष इतरांना मुख्यमंत्री पद देईल हे शक्य नाही. एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार काय, या दोघांनाही इतके राजकीय शहाणपण तर नक्कीच आहे. एकनाथ शिंदेंसारख्या मुरब्बी राजकारण्याला परिस्थितीची जाणीव व्हायला वेळ लागणे अपेक्षितच नव्हते. एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या इतर नेत्यांना भलेही मुख्यमंत्रीपद आपल्याच पक्षाला असे वाटत असेल मात्र राजकारणात अशा वाटण्याला काही अर्थ नसतो. ज्या बिहारचे उदाहरण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते देत होते, त्या बिहारमध्ये भाजपने अगोदरच नितीशकुमार यांच्या नावाची घोषणा केली होती. तसेही बिहारमध्ये नितीश कुमार कोणत्याही क्षणी कूस बदलू शकतात अशी त्यांची ख्याती आहे. आणि नितीशकुमार यांच्याकडे बिहारमध्ये पर्याय देखील आहे. महाराष्ट्राची परिस्थिती तशी नाही. इथे एक तर एकनाथ शिंदेंकडे भाजपला सोडून वेगळा विचार करायचा तर दुसरा पर्याय नाही, अजित पवार अगोदरच फडणवीसांच्या नावाला पसंती देऊन बसलेले , त्यातही मुळात अजित पवारांच्याच राष्ट्रवादीला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होणे रुचणारे नव्हते, त्यामुळेच छगन भुजबळ यांनी लगेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे असेल तर मग त्या पदावर राष्ट्रवादीलाही दावा असेल अशी भूमिका घेतलीच होती . एकूण काय तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होणे यात राष्ट्रवादीचा मोठा स्पीडब्रेकर असणारच होता.
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात संधी आलेली असतानाही मिटीरपक्षाला मुख्यमंत्रीपद देण्याइतके राजकीय औदार्य भाजपकडे कधीच नव्हते, मजबुरीमध्ये, त्या काळाची आवश्यकता म्हणून काही निर्णय घेतले गेले असले तरी आता ज्यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला केले तरी केंद्रातील सरकारलाही फारसा फरक पडणार नाही अशी स्थिती आहे, अशावेळी एकनाथ शिंदेंना 'सहन ' करणे भाजपच्या संस्कृतीत बसणारे नाही. आणि याची जाणीव एकनाथ शिंदेंना नाही असे म्हणने शिंदेंच्या राजकीय चातुर्यावर अन्य केल्यासार्खजे होईल. त्यामुळेच दोन दिवस मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांचा बाजार गरम करून ऐनवेळी काही महत्वाच्या खात्यांवर समाधान मानावे लागेल याची कल्पना शिंदेंना होतीच, नव्हे त्यांना तेच करायचे असेल, म्हणूनच दोन दिवस मौन बाळगल्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी अपरिहार्यतेतून राजकीय शहाणपण दाखविले आहे.
बातमी शेअर करा