Advertisement

 मुळ भाजप स्विकारेना, जवळचेही दुरावले, नमिता मुंदडांच्या अडचणीत वाढ

प्रजापत्र | Monday, 18/11/2024
बातमी शेअर करा

 बीड : केज विधानसभा मतदारसंघातून सध्या प्रतिनिधित्व करीत असलेल्या आणि केवळ विमलताईंच्या पुर्वपुण्याईवर मते मागणाऱ्या नमिता मुंदडांना आता केजचा मतदारसंघ जड जात असल्याचे चित्र आहे. मुंदडा कुटुंबाने पाच वर्षापुर्वी भाजपमध्ये प्रवेश तर केला पण आता एकीकडे मुळ भाजप त्यांना स्विकारत नाही आणि दुसरीकडे जवळचे म्हणणारे देखील दुरावले आहेत. नंदकिशोर मुंदडांच्या सांगण्यावरुन ठिकठिकाणी झालेल्या तक्रारी आणि त्यामुळे दुखावलेले अनेकजण यांच्यामुळे नमिता मुंदडांच्या अडचणी वाढल्या आहेत. 
केज विधानसभा मतदारसंघात मुंदडा कुटुंबाचे राजकारण खऱ्या अर्थाने वाढले ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच. शरद पवारांनी या मतदारसंघात विमल मुंदडा यांना कायम शक्ती दिली. त्यांच्या नंतरही या मतदारसंघात पवारांनी मुंदडा कुटुंबाचा शब्द कधी डावलला नाही. अगदी मागच्या निवडणुकीत शरद पवारांनी पक्षाचे पहिले तिकीट जाहिर केले ते नमिता मुंदडांचे होते, पण त्यावेळी मुंदडा कुटुंबाने शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला. 

 

त्यातून नमिता मुंदडा आमदार झाल्या, पण नंतरच्या काळात मुंदडांनी, विशेषतः नंदकिशोर मुंदडांनी मुळ भाजपला कधी जवळ केले नाही, किंबहुना त्यांच्या अडचणी वाढविल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना काम मिळणार नाही हे तर पाहिले पण अनेकांच्या कामात खोडेही घातले. त्यामुळे आता मुळ भाजपला अगदी पंकजा मुंडे म्हणाल्या तरी नमिता मुंदडांना मते देणे पचत नसल्याचे चित्र आहे. 
केज मतदारसंघात नंदकिशोर मुंदडा यांचा संपर्क मोठा आहे हे खरे असले तरी मागच्या पाच वर्षांत त्यांचे राजकारण अडवाअडवीचे राहिलेले आहे. या काळात त्यांच्या जवळचे अनेक कार्यकर्ते आता त्यांच्यापासून दुरावत आहेत, नमिता मुंदडा यांची व्यक्तीगत प्रतिमा चांगली असली तरी पाच वर्षात त्यांच्या माध्यमातून झालेल्या तक्रारिंमुळे मुंदडा कुटुंबाला आतापर्यंत मदत करणारे अनेक लोक दुखावले त्याचा फटका आता मुंदडांना बसताना दिसत आहे.

Advertisement

Advertisement