Advertisement

मुंदडा परिवाराला मोठा धक्का

प्रजापत्र | Sunday, 17/11/2024
बातमी शेअर करा

केज-तालुक्यातील भांटुबा येथील रहिवासी तथा केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे यांनी मुंदडा परीवाराची तब्बल पस्तीस वर्षांपासूनची साथ सोडत जुने सहकारी खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणुकीत मुंदडा परिवारासाठी हा मोठा धक्का मानला जात असून या प्रवेशामुळे पृथ्वीराज साठे यांचे बळ मात्र वाढले आहे.  
    केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर अण्णासाहेब चवरे हे तालुक्यातील चांगले राजकीय व्यक्तित्व असून मोठा जनसंपर्क असलेले नेते आहेत. प्रत्येक गावात त्यांचा असलेला संपर्क ही चांगला असल्याचे कळते. ज्ञानेश्वर चवरे यांनी पंचायत समिती सभापतीच्या काळात चांगले काम केले होते. पंचायत समिती सभापती म्हणून संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांनी आपला जनसंपर्क वाढविला. मागील ३५ वर्षाच्या काळात दिवंगत विमल मुंदडा यांच्यासोबत काम करताना प्रत्येक गावात आपल्या सोबत माणसे जोडलेली होती. मध्यंतरीच्या काळात नंदकिशोर मुंदडा यांच्यासोबत मतभेद झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून ज्ञानेश्वर चवरे हे नंदकिशोर मुंदडा यांच्यापासून दुरावले होते. सध्या विधानसभा निवडणुका चालू असताना त्यांचा प्रवेश मोठा राजकीय भूकंप मानला जात असून यामुळे नंदकिशोर मुंदडा यांना मोठा धक्का मानला जातोय. तर पृथ्वीराज साठे यांचे बळ यामुळे मोठ्या प्रमाणात वाढले.यावेळी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, ज्ञानेश्वर चवरे हे माझे जुने सहकारी आहेत व माझ्या परिवारातीलच आहेत. ते नक्कीच माझ्या भावाप्रमाणेच राहतील. यावेळी कल्याण शिंनगरे यांची आठवण काढली व जसे ते होते तसे आता ज्ञानेश्वर चवरे राहतील. यावेळी ज्ञानेश्वर चवरे, विलास चवरे, सुनिल धपाटे, पप्पू धपाटे, नाना मोरे यांच्यासहा अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला.

 

Advertisement

Advertisement