Advertisement

सांगाव्याची चर्चा अन सोशल मीडियावर 'पोस्ट युध्द'

प्रजापत्र | Saturday, 16/11/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १५ (प्रतिनिधी) : बीड विधानसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारासाठी अंतरवलीहुन 'सांगावा' आल्याच्या पोस्ट गुरुवारी सायंकाळी काही ठिकाणी झळकल्या अन त्यानंतर अजुनही हा सांगावा खरा का? यावरुन सोशल मीडियात 'पोस्ट युध्द' सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीत आपण कोणतीच भूमिका घेणार नाही, आणि आपला कोणालाच पाठिंबा नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही मनोज जरांगे काहितरी सांगतील या आशेवर बीड मतदारसंघातील अनेक जण आहेत. त्यातच गुरुवारी सायंकाळी उशिरा एका अपक्ष उमेदवारासाठी मनोज जरांगे यांनी 'सांगावा' धाडल्याच्या काही पोस्ट समाज माध्यमांवर झळकल्या, त्यानंतर लगेच दुसऱ्या अपक्ष उमेदवारांची यंत्रणा देखील जागी झाली, कामाला लागली अन 'हा सांगावा खोटा आहे' असे सांगायला सुरुवात झाली. अगदी सांगावा आल्याचे सांगणारांनी नगद नारायणाची शपथ घ्यावी इथपर्यंतचे आव्हान सोशल मीडियामधून समन्वयकांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता 'सांगावा' हाच चर्चेचा विषय ठरला आहे.
 

 

सांगावा का भाग्य चिठ्ठी?
हा सारा प्रकार नेमका काय आहे, याची माहिती घेतल्यानंतर 'प्रजापत्र'च्या हाती या साऱ्या प्रकाराची इन्साईड स्टोरी लागली आहे. मनोज जरांगे यांनी काहितरी भूमिका घ्यावी म्हणून इच्छुक उमेदवार आणि समन्वयक व इतर मनोज जरांगेंना भेटून आग्रह करीत होते. पण मनोज जरांगे यांनी कोणतेही एक नाव सांगायला म्हणे नकार दिला. उलट तुम्ही तुमच्या पातळीवर काय ते ठरवा असे सांगितल्याचे म्हटले जाते. आता या पेचातून मार्ग काढायचा कसा? दोन प्रबळ दावेदारांमधून निवडायचे कोणाला? बरे कोणा एकाची निवड केली नाही तर शक्ती विखुरली जाणार आणि यात ओबीसींचे फावणार असा विचार समन्वयक, आंदोलक, आंदोलनातील सवंगडी अशा अनेकांनी केल्याचे सांगतात. त्यातून मग दोन्ही उमेदवारांच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्याचे ठरले अन अंतरवलीहुन काही अंतरावर म्हणे चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. त्यातून मग ज्याची 'भाग्य चिठ्ठी' निघाली त्यासाठी म्हणे 'सांगावा' सांगितला जात आहे. अर्थात या साऱ्या सांगिव ऐकिव गप्पा आहेत. अशा गोष्टींना अधिकृत दुजोरा देणार तरी कोण?

Advertisement

Advertisement