Advertisement

ऑफिसमध्ये घुसून तरुणीचं अपहरण

प्रजापत्र | Wednesday, 20/01/2021
बातमी शेअर करा

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी अवघ्या सहा तासाच्या आत चिंचवड पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आरोपी प्रियकराच्या तावडीतून तरुणीची सुखरूप सुटका केली. शंतनू चिंचवडे (२५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचे आणि आरोपी शंतनूचे काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर प्रेम होते. मात्र, तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप करत संबंध तोडले होते. यावरून आरोपी चिडलेला होता. त्यामधूनच त्याने तरुणीचे अपहरण केले असल्याचं समोर आले आहे अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली तरुणी उच्चशिक्षित असून इंटिरिअर डिझायनर आहे. ती एका शॉपमध्ये काम करते. मंगळवारी सकाळी ११.३० सुमारास आरोपी शंतनू ऑफिसमध्ये आला आणि पिस्तुल दाखवून संबंधित तरुणीचे फिल्मीस्टाईल अपहरण केले. तरुणीने आरडाओरड करत मदतीची याचना केली. मात्र, ऑफिसमधील कर्मचारी किंवा इतर व्यक्ती तरुणीच्या मदतीला धावले नाहीत. दरम्यान आरोपीने अॅक्टिव्हावरून तळेगाव परिसर गाठला.
 याच दरम्यान, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी तरुणीच्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ चिंचवड पोलीस ठाणे गाठत माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी वेळ न घालवता तपासाची चक्रे फिरवली. यावेळी आरोपी तळेगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले आहे. अवघ्या सहा तासाच्या आत तरुणीची सुखरूप सुटका पोलिसांनी केली. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Advertisement