Advertisement

'साहेब गल्ला हलवा , असली नकली ओळखा '  

प्रजापत्र | Wednesday, 13/11/2024
बातमी शेअर करा

किस्से प्रचारातले ...
बीड  दि. ११ (प्रतिनिधी ) : निवडणूक म्हणजे नव्या जुन्या कार्यकर्त्यांना आपली ओळख पटवायची संधी असते , निवडणुकीच्या वातावरणात कोठे इनकमिंग तर कोणाकडून तरी आउटगोइंग सुरूच असते. जाणारे कार्यकर्ते नेहमी 'आमचा विठ्ठलाला विरोध नाही, पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय ' असली वाक्ये बोलत असतात , आता पक्षात नव्याने प्रवेश करणारी कार्यकर्ते देखील 'साहेब आम्हाला पूर्वीच यायचं होतं हो, पण तुमच्या जवळचे लोक येऊच देत नाहीत , तुम्ही जरा गल्ला हलवा आणि त्यातले असली नकली कोण हे ओळखा ' असे म्हणत असतील तर बिचाऱ्या नेत्याने तरी काय करावे ?
विधानसभा निवडणूक जसजशी रंगात येत आहे, तसे अनेक कार्यकर्त्यांचे इकडून तिकडे प्रवेश होत आहेत. मोठ्या प्रमाणावरचे राजकीय आयुष्य एखाद्या ठिकाणी काढल्यानंतर आता दुसरीकडे जायचे तर त्यासाठी कार्यकर्त्यांकडे कारणे  देखील असतात  , ' येथे गळचेपी झाली, नेत्याला भेटताच येत नाही, नेता चांगलाय हो, पण त्याला भलत्यानीच घेरलंय ' असलं काही ना काही कार्यकर्ते बोलत असतात. हे झाले पक्ष सोडतानाच, पण एखाद्या पक्षात येताना कार्यकर्त्यांनी नेत्याला 'जवळच्या लोकांचे चेहरे ओळखा ' असे सांगणे म्हणजे जरा अपवादच .
तर दोन दिवसांपूर्वी एका मतदारसंघात काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या गटात प्रवेश केला. आता प्रवेशाचा सोहळा रंगही चांगला . हवाला आमदार करण्यासाठी दुसरा भाऊ कंबर कसत असेल तर प्रवेश सोहळे देखणे होणार यात 'नवल ' ते कसले. तर या प्रवेशाच्या वेळी , 'साहेब आम्ही तर तुमचेच होतो, आम्हाला मागेच तुमच्याकडे यायचे होते , पण ... ' असे म्हणत प्रवेश करणारांनी जे काही सांगितले ते नेत्यांना देखील भावनिक करणारे होते. 'साहेब , तुमच्या आसपास जे लोक आहेत, ते कान भरून देतात, ते इतरांना तुमच्या जवळ येऊ देत नाहीत , तुम्ही एकदा गल्ला हलवा आणि त्यातले असली कोण, नकली कोण ते ओळखा , आम्ही तर तुमचेच, मात्र आज हे बोलावं लागतंय ' असे विधान केले. नव्याने प्रवेश करणाराकडून तस तर असलं भाषण अपेक्षित नाही , पण कार्यकर्ता बोलतोय म्हणल्यावर नेत्यांनीही ' ठीकय मला कधी बोलले नाही, पण उमेदवारासाठी का होईना तुम्ही स्पष्ट बोलले , खर्च उमेदवार नशीबवान आहेत, आता त्यांचे बळ वाढवा ' असे म्हणण्यापलीकडे काय करावे .

Advertisement

Advertisement