बीड दि. ११ (प्रतिनिधी ) : 'दुभंगलेली मनं आणि पांगलेलं कुटुंब एकत्र करण्यासाठी' म्हणून पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीमागे उभे राहण्याची काका जयदत्त क्षीरसागर यांनी घेतलेली भूमिका बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असलेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांचे राजकीय बळ वाढविणारी ठरणार आहे.
बीडच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या क्षीरसागर कुटुंबात सहा सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा फूट पडली , त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता.माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे भाऊ रविंद्र क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर जयदत्त क्षीरसागरांपासून वेगळे झाले. नगरपालिकेत रविंद्र क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यात लढत झाली, त्यात भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले, पण हा विजय निसटता होता. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यात लढत होऊन संदीप क्षीरसागर आमदार झाले. त्यानंतर सुमारे साडेतीन वर्षांनी जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे तथा भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांनी वेगळी राजकीय वाट निवडली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तिन्ही क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार राहतात का काय? असे चित्र होते, असे झाले असते तर क्षीरसागर समुहाच्या एकूणच राजकारणावर परिणाम झाले असते. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेत तिरंगी लढत तर टाळली, तरी जयदत्त क्षीरसागर यांची नेमकी भूमिका महत्वाची होतीच, आता त्यांनी क्षीरसागर कुटुंबातील संदीप क्षीरसागर यांचा अपवाद वगळता रविंद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर यांच्यासह संपूर्ण कुटुंब एकत्र आणण्यात यश मिळविले आहे. तसेच या निवडणुकीत आपली शक्ती योगेश क्षीरसागर यांच्या मागे उभी केली आहे.
जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठिंब्याला बीड विधानसभा मतदारसंघात मोठा अर्थ आहे. कारण आजपर्यंतच्या राजकारणात जयदत्त क्षीरसागर यांचे राजकारण सर्वसमावेशक राहिलेले आहे. ओबीसींचे नेते असलेल्या जयदत्त क्षीरसागरांचे सामान्य मराठा समाजाला कधी फारसे वावडे नव्हते, किंबहुना त्यांचा मोठ्याप्रमाणावर मतदार मराठा राहिलेला आहे. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये या संदर्भाला फार मोठा अर्थ आहे. जयदत्त क्षीरसागरांच्या केवळ सोबत येण्याने गंगाधर घुमरे , गणपत डोईफोडे , विलास विधाते,तानाजी कदम , विलास बडगे असे वेगवेगळ्या भागातील प्रभावी लोक योगेश क्षीरसागर यांच्यासोबत जोडले गेले आहेत. कोणत्याही निवडणुकीत महत्वाच्या असणाऱ्या घाटावरून बाबूशेठ लोढा यांच्यासारखा माणूस जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे आता योगेश क्षीरसागरांच्या मदतीला येत आहे. बीड विधानसभा मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर यांनी कायम सामाजिक सलोखा जपला. मुस्लिम समाजात त्यांच्या 'गंगा जमुनी तहजीब'ची चर्चा कायम असते, किंबहुना ओवेसी यांच्यासारख्या नेत्यांनी सांगून देखील इथला मुस्लीम समाज काही अपवाद वगळता जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेला आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांचे सोबत असणे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी महत्वाचे आहे. त्या पलीकडे जाऊन मधल्या काळात जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर हे दोन गट वेगवेगळे असल्याने अनेकांची गोची होत होती. कोणाला विरोध कसा करायचा, आमच्यासाठी दोघेही महत्वाचे, आम्ही डॉ. योगेश क्षीरसागरांसोबत आहोत, मात्र आम्हाला पोटापाण्याला लावलं ते जयदत्त क्षीरसागरानी असे सांगणारा वर्ग देखील मोठा आहे. वडील जयदत्त क्षीरसागरांसोबत आणि मुलगा डॉ. योगेश क्षीरसागरांसोबत, मग करायचे काय अशी परिस्थिती असणाऱ्या अनेकांची कोंडी देखील आता संपलेली असेल. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचे बळ योगेश क्षीरसागर यांच्यासाठी सारीच समीकरणे बदलवणारे असेल .