महायुतीमधले सदाभाऊ खोत काय किंवा महाविकास आघाडीमधले संजय राऊत काय, महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही एक पोत आणि आब होता, त्याला धुळीला मिळविण्याचे प्रकार सध्या राजकीय नेत्यांकडून सुरु आहेत. शारीरिक व्यंगांवरून केली जाणारी टीकाटिपण्णी असेल किंवा राजकारणाला पार प्राणिसंग्रहालयाचे स्वरूप देण्याचा प्रकार , हे महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारे नाही. त्यामुळे असल्या बेताल बडबडीला लगाम लावायलाच हवा .
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार आता कुठे सुरु झाला आहे. आणखी या प्रचारात रंग भरायचा आहे. सभांचा धडाका सुरु व्हायचा आहे, मात्र सुरुवातीच्या टप्प्यातच यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा दर्जा काय असेल याचे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. राजकारणात टीकाटिपण्णी करताना ती संसदीय असावी असे संकेत आहेत. राजकारण्यांच्या मागच्या काही पिढ्यानी ते पाळले आहेत. प्रत्येकवेळी काही अपवादात्मक उदाहरणे म्हणून कधी तरी असंसदीय टीका झाली असेल, मात्र तशा टीकांना कधी स्वीकारले गेले नाही, मात्र मागच्या काळात हे सारेच चित्र बदलले आहे. सदाभाऊ खोतांसारखे वाचाळवीर काय वाटेल ते बडबडू शकतात आणि जे महाराष्ट्राचे नेते किंवा चेहरा म्हणून स्वतःला दाखवीत असतात ते फडणवीस ते सारे शांतपणे ऐकत असतात , हे भाजपच्या राजकीय संस्कृतीचा किती ऱ्हास झाला आहे हे दाखवायला पुरेसे आहे.
आज शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी भाजपवाले सोडायला तयार नाहीत. त्यांनी तशी टीका करू नये असेही काही नाही. शेवटरी महाराष्ट्रात महायुतीला आपल्या विजयाच्या वाटेवर येऊ शकणार एकमेव चेहरा दिसतोय तो शरद पवारांचाच . शरद पवारांचे राजकारण संपविण्याचे कितीही प्रयत्न महायुतीने केले तरी शरद पवार त्याला पुरून उरले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला भाजपचे क्रमांक एकचे टार्गेट शरद पवार आहेत. ते तसे असण्याला कोणाचा विरोध असण्याचे देखील काही कारण नाही. मात्र तो विरोध करताना कोणत्या मुद्द्यांवर करावा याचे काही तारतम्य ठेवणे अपेक्षित असते . मात्र भाजपमध्ये आता असले तारतम्य नावाचा प्रकार शिल्लक आहे असे वाटत नाही. म्हणूनच सदाभाऊ खोत काय किंवा राणे कुटुंब काय किंवा त्यांच्याच माळेतले इतर मणी काय, यांच्याबद्दल भाजप कधी अवाक्षर देखील काढत नाही, किंवा त्यांना समज वगैरे काही देण्याच्या भानगडीत पडत नाही. या लोकांची बडबड कितीही बेताल असली आणि महाराष्ट्रातील जनतेला किळस यावी अशी असली तरी पक्षाच्या प्रमुखांना त्याचे काही वाटत नाही, ही एकूणच राजकारणाची अधोगती आहे.
अर्थात असे प्रकार केवळ महायुतीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये सारे काही फार व्यवस्थित , शिस्तीत आहे असेही समजण्याचे काहीच कारण नाही. आघाडीकडे देखील संजय राऊत काय किंवा खुद्द नाना पटोले काय , इकडेही बेताल बडबड करणारे आहेतच . मागच्या दोन दिवसात सदाभाऊ आणि संजय राऊत यांच्यातील जो काही शिमगा सुरु आहे, तो कोणत्याच सुसंकृत समाजात शोभणारा नाही. निवडणुकीच्या प्रचारात चर्चा व्हायला हवी ती राज्यांसमोरच्या प्रश्नांची , त्यांना सामोरे कसे जायचे याची, विकासाचे अजेंडे काय आहेत किंवा काय असावेत यावर बोलले जायला हवे . मात्र त्यापलीकडे जाऊन व्यक्तिगत टीकाटिपण्णी , धोरणांवर टीका करण्याऐवजी व्यक्तिकेंद्री टीका महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी नसायच्या आणि असल्याचं तरी अपवादाने असायच्या. आता त्याचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. अशा प्रकारची उथळ बडबड करणारांना त्या त्या राजकीय पक्षांमध्ये महत्व देखील येत आहे. पूर्वी समाजकारणात काम करून राजकारणात मोठे होता यायचे, राजकारणात मोठे होण्यासाठी जनतेत जावे लागायचे आता माध्यमांसमोर बेताल बडबड केली की लगेच आपण चर्चेच्या केंद्रस्थानी येतो असा समज दृढ झाला आहे. याला माध्यमे आणि समाज देखील तितकाच जबाबदार आहे. मात्र हे कोठे तरी थांबायला हवे. राजकारण्यांनी टीका करताना आपल्या तोंडाची गटारे होऊ नयेत इतकी काळजी घ्यावी आणि पक्षाच्या वरिष्ठांनीही आपल्या वाचाळ नेत्यांना आवरावे इतकी माफक अपेक्षा महाराष्ट्रातील मतदार करीत आहे.