बीड दि. २७ (प्रतिनिधी ) : बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांच्या राजकीय आशिर्वादावर विधानसभा निवडणूक लढविणारांची संख्या मोठी आहे. बीडसाठी मनोज जरंगे यांच्याकडे तब्बल १७ जणांनी मुलाखत दिली होती. त्या सर्वांनाच मनोज जरांगे यांनी 'तुम्ही सारेच अर्ज भरा , माझा निर्णय मी नंतर सांगतो ' असा निरोप दिलेला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांचा आशीर्वाद हवा असलेले सारेच उमेदवार बीडमध्ये 'हम साथ साथ है ' म्हणत एकत्र येऊन प्रत्येकाचे वेगवेगळे अर्ज भरणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन वेगवेगळे अर्ज भरण्याची कदाचित बीडचा इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल.
बीड विधानसभा मतदारसंघातील सामाजिक समीकरणांचा विचार करता येथे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा चांगलाच प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा राजकीय आशीर्वाद म्हणजे यशाच्या जवळ जाण्याची खात्री असे सर्वांनाच वाटते. विशेष म्हणजे जरांगे यांचा राजकीय आशीर्वाद आपल्यालाच मिळावा अशी देखील प्रत्येकाची इच्छा आहे. बीडमध्ये माजी मंत्री सुरेश नवले, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे , सनदी लेखापाल तथा नारायणगडाचे विश्वस्त बी. बी. जाधव, उद्योजक तथा नारायणगडाचे विश्वस्त बळीराम गवते, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, भाजपचेच आणखी एक माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह इतरही काहींना बीड विधानसभेची निवडणूक मनोज जरांगे यांचा उमेदवार म्हणून लढवायची आहे.
मनोज जरांगे यांना देखील बीड विधानसभा मतदारसंघातील या स्पर्धेची चांगलीच जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. जे जे कोणी इछुईक आहेत, त्यांनी अर्ज भरावेत , नंतर आपण कोणतातरी एक निर्णय घेवूत, मग इतरांनी अर्ज मागे घ्यायचे ' असा निरोप मनोज जरांगे यांचा आहे. त्यामुळे आता बीडमध्ये एक वेगळाच पॅटर्न राबविला जाणार आहे. जे जे कोणी मनोज जरांगे यांच्याकडून इच्छुक आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन अर्ज भरायला जायचे आणि प्रत्येकाने आपला अर्ज भरायचा. या माध्यमातून मतदारसंघात मनोज जरांगे यांच्या 'एकीचे बळ' दाखवायचे असे काहीसे नियोजन केले जात आहे. आता हे एकीचे बळ एक नाव निश्चित झाले आणि इतरांना माघार घ्यायची वेळ आली तर टिकणार का हा प्रश्न असला तरी त्यावर आज तरी चर्चा नको.
प्रजापत्र | Monday, 28/10/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा