Advertisement

गेवराईत वंचितचे ओबीसी कार्ड      

प्रजापत्र | Monday, 21/10/2024
बातमी शेअर करा
सलमान शेख
(लक्षवेधी)
 
गेवराई- राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घामासन सुरू आहे.तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत उमेदवार जाहीर करण्यात चांगलीच ‘आघाडी’ घेतली.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी १६ जणांची चौथी यादी घोषित केली.यात गेवराई मतदारसंघातून सरपंच असलेल्या प्रियांका शिवप्रसाद खेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर गेवराई मतसंघातील सत्तासमीकरणे पाहता वंचित बहुजन आघाडीने खेळलेले ओबीसी कार्ड मतदारसंघातील प्रमुख विरोधी उमेदवारांसाठी आता डोकेदुखीचा विषय राहणार आहे.सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रासोबतच राजकारणात देखील खेडकर कुटुंबियाचा दबदबा पूर्वीपासून असल्याने या मतदारसंघातील लढती काटेदार ठरणार यात शंका नाही.
 
 

 

 
 
            गेवराई विधानसभेसाठी मतदारांची संख्या साधारण साडेतीन लाखांच्या घरात आहे.यात १ लाख ८५ हजारांच्या पुढे पुरुष तर १ लाख ६६ हजारांच्या पुढे महिलांची संख्या आहे.विशेष म्हणजे गेवराई तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चकलांबा गावात प्रियांका खेडकर यांनी निर्विविद सत्ता मिळविली होती.प्रियांका यांचे पती शिवप्रसाद खेडकर कार्यकारी अभियंता असून त्यांचा लोकसंग्रह देखील मोठा आहे.याशिवाय त्यांचे वडील भगवानराव खेडकर १० वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते.मुंडे कुटुंबियांशी त्यांचे ऋणानुबंध तसे अत्यंत जवळचे.गावाच्या राजकारणात खेडकर दाम्पत्याचा पूर्वीपासूनच तसा दबदबा राहिला आहे.त्यात चकलांबासारख्या मोठ्या ग्रामपंचायला टोकाचा विरोध असताना एकहाती सत्ता मिळविण्यात त्यांना यश आले होते.ओबीसींचे प्रश्नांवर जागर,त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणे,राजकारणात महिला उमेदवार म्हणून स्वतःची छापा पाडण्यात प्रियांका यांना चांगले यश आले.गेवराई विधानसभेत मराठा समाजाची संख्या सव्वा लाखांच्या घरात असल्याचे चित्र आहे.पण यात आ.लक्ष्मण पवार,बदामराव पंडित,विजयराजे पंडित हे सर्व संभाव्य उमेदवार देखील मराठा समाजाचे असल्याने ओबीसींचे प्राबल्य येथे महत्वाचे ठरणार.मुस्लिम समाज ४१ हजार तर दलित समाज ३५ हजारांच्या घरात असून १ लाखांच्या आसपास ओबींसीची या मतदारसंघात ताकद असल्याचे कळते. त्यात प्रियांका खेडकर यांच्या रूपाने गेवराई मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्याने दलित मतदान देखील त्यांच्याकडे बऱ्यापैकी वळले जाणार.त्यामुळे गेवराई मतदारसंघात आजघडीला जरी कोण कुठून उभे रहाणार हे निश्चित नसले तरी प्रकाश आंबेडकर यांनी खेळलेले ओबीसी कार्ड गेवराई मतदारसंघातील जनतेसाठी एक भक्कम पर्याय म्हणून पुढे येत आहे.

Advertisement

Advertisement