Advertisement

कृषिमंत्र्यांच्या जिल्हयात फक्त १० शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची मदत

प्रजापत्र | Monday, 30/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि.३० (प्रतिनिधी)-राज्यभरात या पावसाळ्यात सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मोठी मदत देखील जाहीर केली आहे. जुलै आणि ऑगस्ट (July and August) महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा राज्यातील १ लाख ८३ हजार ९०७ शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. मात्र वारंवार अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात (Beed District) जुलै आणि ऑगस्टमधील अतिवृष्टीपोटी अवघ्या १० शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या बाबतीत राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थिती असल्याचे चित्र आहे.
   बीडचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री आहेत. (dhananjay munde agriculture minister) कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक काय देता येईल याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याचे सांगितले जात असते. मात्र त्यांच्या स्वतःच्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांवर बोंब मारण्याची वेळ आली आहे.सरकारने राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली आहे.यात वेगवेगळ्या विभागात मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र बीड जिल्ह्यात केवळ १० शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्टमधील अतिवृष्टीमध्ये केवळ ७. ८ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अहवाल असून त्यापोटी आता जिल्ह्याला २ लाख ८० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे.कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची परिस्थिती अशी असेल तर शेतकऱ्यांना शिमगा केल्याशिवाय काय पर्याय राहणार असा सवाल आता उपस्थित होत आहे.आता कृषिमंत्री काय भूमिका घेतात आणि खरोखर ओळखीचा वाढप्या बीड जिल्ह्याच्या पत्रावळीवर काहीसे अधिक टाकणे तर दूर भुकेपुरते तरी देणार का याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. 

 

Advertisement

Advertisement