Advertisement

संवाद मेळाव्याचा सुकाळ

प्रजापत्र | Sunday, 29/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. २८ (प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल असे संकेत मिळताच कोठून तरी कोठे तरी जाण्याची राजकीय अपरिहार्यता असलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची आवश्यकता वाटू लागलेली आहे. नेत्यांचा निर्णय भलेही ठरलेला असेल, त्यावर  'कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा' शिक्का जोपर्यंत बसत नाही, तोवर नेत्यांना सुरक्षित कसे वाटणार, म्हणूनच आता संवाद मेळाव्याच्या माध्यमातून नेते काही निर्णय घेतील असे अपेक्षित आहे. माजलगाव मतदारसंघात सध्या भाजपमध्ये असलेले मोहन जगताप आज मित्रमंडळाचा मेळावा घेत आहेत, तर विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केलेले गेवराईचे आ. लक्ष्मण पवार हे मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

 

        महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणाने राज्यातील जवळपास बहुतांश मतदारसंघात अनेकांची गोची केली आहे. महाविकास आघाडीला तरी बहुतांश ठिकाणी राजकीय अपरिहार्यता म्हणून तडजोडीची मानसिकता करायला वेळ मिळाला, मात्र महायुतीच्या बाबतीत तसे नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा झालेला प्रवेश खऱ्या अर्थाने भाजपसाठीची डोकेदुखी ठरलेला आहे. अनेक मतदारसंघातून भाजपकडून ज्यांनी विधानसभेसाठी तलवारी प्रजल्या होत्या, त्यांना आता मतदारसंघ भाजपला मिळणार नसल्याने काय करावे हा प्रश्न आहेच. शेवटी माघार तरी किती दिवस घ्यायची? नेत्यांनी ऐनवेळी कोणत्याही तडजोडी कराव्यात आणि कार्यकर्त्यांनी सहन तरी किती करायचे असे म्हणत तिकिटाचे व्हायचे ते होईल, आपण निवडणूक तर लढवू अशी मानसिकता काही ठिकाणी आहे, तर भाजपचा असाही फटकाच बसणार आहे, मग भाजप हवाच कशाला, पण सोडताना खापर आपल्यावर नको अशी भूमिका काही ठिकाणी आहे.
        माजलगाव विधानसभा मतदारसंघात छत्रपती सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष असलेले मोहन जगताप हे अनेक दिवसांपासून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मागच्यावेळीच त्यांचा उमेदवारीवर दावा होता, मात्र पक्षाने रमेश आडसकरांना उमेदवारी दिली. जगताप यांची कशी तरी समजूत घालण्यात आली, तरीही निवडणुकीत आडसकरांना हबाडा बसलाच. आता तर माजलगाव मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे, बरे भाजपला सुटलाच समजा तरी येथून आडसकर यांच्यापासून ते बाबरी मुंडेंपर्यंत अनेकजण इच्छुक, मग पुढे काही होण्यापेक्षा आताच निर्णय घेतलेला बरा असे मोहन जगताप यांना वाटणार असेल तर त्यात वावगे ते काय, म्हणूनच ते आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
गेवराईचे आ. लक्ष्मण पवारांची परिस्थिती आणखीच वेगळी. त्याचे महामहिम आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे अंतर अगोदरच वाढले होते, मात्र ज्या 'सागर ' बंगल्यावरून आधार मिळायचा आता तो देवेंद्रच पारखा झालेला, मग भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून तरी काय होणार, बरे गेवराई मतदारसंघात जरांगे यांचा रोष देखील परवडणार नाहीच. मग त्यांनी लगेच आपण निवडणूक लढविणार नसल्याची घोषणाच करून टाकली. त्याचवेळी ते तुतारी वाजविणारे अशा चर्चा देखील सुरु आहेतच. आता आपलीच घोषणा बदलायची तर त्यासाठी 'कार्यकर्त्यांचा फारच आग्रह झाला हो ' असे तरी सांगावे लागणारच ना , त्यासाठी आता मंगळवारी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
       माजलगाव असो किंवा गेवराई, भाजपमधली अस्वस्थता तुतारीला मात्र बळ देणारी ठरेल असेच चित्र आहे. अर्थात त्यासाठी मेळावे संपण्याची वाट पाहावी लागेल.

Advertisement

Advertisement