Advertisement

'शेतकरी पुत्रा' च्या यशानंतर आता 'शेतकरी मित्र ' चा प्रयोग    

प्रजापत्र | Friday, 27/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२६ (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये 'शेतकरी पूत्र' ही संकल्पना म्हणा किंवा घोषणा तुफान यशस्वी ठरली. इतकी की, ही बजरंग उडी चक्क लोकसभेत पोहोचली.त्यामुळे आता स्वतःला शेतकऱ्याशी जोडून घेऊन निवडणुकीतील यशाची खात्री करण्याचे प्रयोग सुरु आहेत. त्यातूनच आता भाजप जिल्हाध्यक्षांनी 'शेतकरी मित्र 'चा प्रयोग सुरु केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये त्यांच्याबद्दल फार चांगले म्हणावे असे वातावरण राहिलेले नाही,त्यामुळे आता त्यांच्या समर्थकांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून 'मित्रमंडळ' सक्रिय केले आहे.
    बीड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र मस्के तसे पहिल्यापासूनच धडाडीचे.राजकारण, समाजकारणात नवनव्या प्रयोगात स्वतःला झोकून देण्यात त्यांच्याइतके धाडस क्वचितच इतर कोणात असेल.आपले इप्सित साध्य करण्यासाठी अगदी स्वकियांशी देखील 'संग्राम' कसा मांडायचा आणि स्वतःचा राजयोग कसा साधायचा यात त्यांचा हातखंडा.शेतकऱ्यांसाठी कधी छावणी, तर काही सामुहिक विवाह,कधी आणखी काही तरी, ते करीत असतातच.त्यासोबतच 'सरकारी गोपालनातून' वेगळे पुण्य देखील हातावेगळे होतेच.तर बैलगाडा शर्यत हा मराठमोळा कार्यक्रम म्हणजे राजेंद्र मस्के यांचा आवडीचा विषय.त्याचे आयोजन आणि नियोजन देखील राजेंद्र मस्के मोठे देखणे करतात.मागच्या वर्षीच्या त्यांच्या या स्पर्धा चर्चेत राहिल्या होत्या. अगदी डोळ्याचे पारणे फेडाव्या अशा, तर त्यांनी आता याही वर्षी अशाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.अर्थात यावेळी थोडा बदल झालाय. हे आयोजन राजेंद्र मस्के यांनी नव्हे, तर म्हणे त्यांच्या 'मित्रमंडळाने' केले. आता मित्रमंडळ सक्रिय झाल्यावर त्याला पुन्हा पक्षीय स्वरूप कशाला,त्यात व्यापकता आणायची म्हणून असेल कदाचित,पण या स्पर्धांचे जे बॅनर झळकलेत, त्यावर भाजपच्या कोणत्याच नेत्याचा फोटो नाही,अगदी पंकजा मुंडेंचाही. त्याही पुढे जाऊन आतापर्यंत संघर्षयोद्धा असणारे राजेंद्र मस्के या बॅनरवर झालेत ते 'शेतकरी मित्र' हा बदल का झाला असावा याचेही एक कारण आहेच. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'शेतकरी पुत्र' ही संकल्पना भलतीच हिट ठरली. अगदी शेतकरीपुत्र दिल्लीत पोहोचले. आता शेतकरीपुत्र दिल्लीत पोहोचतायत म्हटल्यावर विधानसभा गाठायची असेल तर किमान 'मित्र' तरी व्हायलाच हवे ना? आणि मग त्यासाठी पुन्हा पक्षाच्या संकुचित मर्यादा हव्यात तरी कशाला, असेही लोकसभा निवडणुकीनंतर जो तो संशयानेच बघणार असेल तर 'मित्रमंडळ' सक्रिय केलेले काय वाईट असाही विचार मनात येऊ शकतोच की? कारण काही का असेना आणि आयोजक कोणी का असेना, बैलगाडा शर्यतीचा आनंद मात्र बीडकरांना घेता येणार आहे, आता फक्त बघायचे इतकेच, ही शर्यत खरेच विधानसभेच्या रस्त्याला लागते का पुन्हा काही अडथळे येतात.

Advertisement

Advertisement