आठवण
बीड दि. २४ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यात सुरुवातीला माजलगाव आणि १९७८ पासून केज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव राहिलेला आहे. म्हणजे पाच दशकांहून अधिक काळ हा मतदारसंघ राखीव राहिला,येथून काँग्रेस, राष्ट्रवादी इतकेच काय अगदी भाजपलाही संधी मिळाली , मात्र आंबेड्करीवाडी विचारांवर राजकीय वाटचाल करणाऱ्या रिपाई, बसप किंवा भारिप सारख्या पक्षांना या जिल्ह्यातील राखीव मतदारसंघात एकदाही संधी मिळाली नाही. सर्वच आंबेडकरवादी संघटनांनी खरेतर विचार करावी अशीच ही गोष्ट.
विधानसभेच्या राज्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ बीड जिल्ह्यातला. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९६७ आणि १९७२ या दोन निवडणुकांमध्ये माजलगाव मतदारसंघ राखीव होता. त्या काळात काँग्रेसचे संकेरन नाथू त्रिभुवन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या विरोधात त्यावेळी बी. ए . मस्के (१९६७) व विठ्ठल मरिबा राव (१९७२ ) यांनी निवडणूक लढविली, मात्र त्यांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
नंतर १९७७ च्या निवडणुकीला केज मतदारसंघ राखीव झाला . तो आजपर्यंत आहे. मात्र येथून प्रत्येकवेळी प्रस्थापित नेते म्हणतील तो किंवा प्रस्थापित पक्षांचा उमेदवाराचं निवडणून आला. बीड जिल्ह्यात आंबेडकरवादी चळवळींची शक्ती आणि प्रभाव मोठा राहिलेला आहे. येथील आंदोलनांची शक्ती देखील मोठी. विद्यापीठाच्या नामांतराचा आंदोलन असेल, किंवा गायरानधारकांची आंदोलने , अगदी राज्यातील दलित हक्कांच्या संदर्भाने कोणत्याही घटनांवर तीव्र प्रतिक्रिया देणारा 'सजग ' जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख. या जिल्ह्यातील आंबेडकरी विचारांच्या नेत्यांचा दबदबा तसा राज्यातच. मात्र असे असले तरी निवडणुकीच्या राजकारणात रिपाई, बसप आणि अगदी भारिप बहुजन महासंघाला देखील फारसे स्थान मिळविता आले नाही हेच वास्तव आहे.
केज राखीव झाल्यानंतर पहिले आमदार झाले ते भागजीराव सातपुते, ते म्हणजे आडसकरांचे निष्ठावंत, त्यांच्यानंतर १९८० च्या निवडणुकीत शरद पवार यांच्याकडून गंगाधर स्वामी आमदार झाले. , पुन्हा भागुजीराव सातपुते (१९८५ ) आणि १९९० ते २०१२ पर्यंत विमल मुंदडा , नंतर अल्पकाळासाठी पृथ्वीराज साठे , त्यानंतर संगीता ठोंबरे आणि आता नमिता मुंदडा येथल्या आमदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपलाही येथून संधी मिळाली. सुरुवातीला रिपाई , रिपाई(खोब्रागडे ) यांच्याकडून रामभाऊ हजारे यांनी निवडणूक लढविली, पण ते कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या पाचव्या क्रमांकावर राहिले. भारिप बहुजन महासंघाने कधी श्रीपती जोगदंड, कधी लँकेशा वेडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले, मात्र त्यांनाही चौथा किंवा पाचव्या क्रमांकावरच राहावे लागले. अपवाद वगळता ५ -७ % मतांचा टप्पा कोणालाच ओलांडता आला नाही. बसपाने देखील या मतदारसंघात नशीब आजमावले. ज्ञानोबा कांबळे, विजयकुमार वेडे हे येथून २००४ आणि २००९ मध्ये उमेदवार होते, पण यश त्यांच्यापासून दूरच राहिले. २०१२ पासून तर होता तितका प्रभाव देखील संपल्याचे चित्र आहे. त्यामुळेच संघटनात्मक शक्ती आणि प्रभाव असतानाही निवडणुकीच्या राजकारणात या पक्षांना विजयाचे गणित कधी जुळवित आले नाही आणि प्रस्थापित पक्षांनी हा मतदारसंघ कधीच इतरांसाठी 'ढिला ' सोडला नाही.
प्रजापत्र | Wednesday, 25/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा