Advertisement

खळ्ळ खटयाकमधून साधणार कसलं नवनिर्माण?

प्रजापत्र | Sunday, 22/09/2024
बातमी शेअर करा

मनसेच्या राडयामुळे रेसिडंट डॉक्टर रुग्णालय सोडून जाण्याच्या मानसिकतेत
 

बीड दि.२२(प्रतिनिधी)-:बीडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे सांगत दोन दिवसांपूर्वी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी जो राडा केला,वैद्यकीय अधिकाऱ्यांना जी शिवीगाळ केली त्याचा परिणाम आरोग्यसेवेवर होत आहे.'असली दादागिरी असेल तर आम्हाला इथे कामच करायचे नाही अशी भूमिका आता रेसिडंट डॉक्टर घेऊ लागले आहेत.सार्वजनिक आरोग्य सेवेच्या बाबतीत तक्रारी असू शकतात,आहेत पण म्हणून कुठेही खळ्ळखटयाक स्टाईलच्या दादागिरीमुळे उद्या सार्वजनिक आरोग्यसेवाच विस्कळीत होणार असेल तर सामान्यांना आरोग्य सेवा कोण देणार याचे उत्तर मनसे देणार आहे का? 
         मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी बीडच्या जिल्हा रुग्णालयात केलेल्या राडयाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भाने अनेक तक्रारी आहेत,त्यातील बहुतांश प्रकरणात तथ्य देखील आहे.काही प्रकरणात व्यवस्थेतील काही कामचुकारांकडून कुचराई देखील होते,पण हे सगळे असले तरी आजही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच सामान्यांना आधार आहे.रात्री-अपरात्री जेंव्हा हजारो रुपये मोजण्याची तयारी असतानाही खाजगी दवाखाना उघडत नाही,तेंव्हा प्रत्येकाला सरकारी दवाखानाच उघडा असतो.कोरोनाच्या महामारीत याच व्यवस्थेने स्वत:च्या जिवावर उदार होऊन सामान्यांना सेवा दिली होती.आजही आणिबाणीच्या प्रसंगी वेळ काळ विसरुन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच सामान्यांना आधार असते. त्यामुळे ही व्यवस्था टिकली पाहिजे.ही व्यवस्था ठप्प पडली तर पुढारपण करणारांचे काही बिघडत नाही,पण याचा फटका सामान्यांना बसतो.याचे भान ठेवले जाणे आवश्यक आहे. 
रुग्णालयात रुग्णांवर वेळेवर उपचार व्हायलाच हवेत,पण त्यासाठी भरपूर मार्ग आहेत.ते डॉक्टर,कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की होणार असेल तर आरोग्य कर्मचारी काम कसे करणार? कालच्या राडयानंतर अंबाजोगाईच्या ज्या रेसिडंट डॉक्टरांची बीडला नियुक्ती झाली होती ते आता काम सोडण्याची भाषा करीत आहेत.सरकारी दवाखान्यात भितीचे वातावरण आहे. 
मागच्या काही काळात आंदोलन किंवा सामान्यांचे प्रश्न मांडणे म्हणजे शिवीगाळ,तोडफोड,धमकी,इशारे असाच समज रुजविला जात आहे.त्याला काही स्तरातून पाठबळ मिळत आहे.मात्र अशा प्रकारांनी खरोखर प्रश्न सुटतात का? यातून खरेच नवनिर्माण होते का? चालू व्यवस्था ठप्प पाडणे म्हणजे नवनिर्माण आहे का? कोणत्याही संघटनेचे पदाधिकारी झाले म्हणजे कोणालाही शिवीगाळ,धक्काबुक्की, प्रसंगी मारहाण करण्याचे,चोर ठरविण्याचे अधिकार मिळतात का याचे 'प्रबोधन' करण्याचा वेळ आता राज ठाकरेंनीच काढावा आणि आपल्या 'उतावळया' कार्यकर्त्यांना नवनिर्माणाचा खरा अर्थ सांगावा हेच अपेक्षित आहे. 

(बीड जिल्हयात या पूर्वी मनसेने कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर,कधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर,सामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली,त्या आंदोलनांना सामान्यांनी आणि माध्यमांनी डोक्यावर घेतले होते.मात्र ती आंदोलने कधी कोणावर दहशत माजविण्यासाठी नव्हती,अश्लिल शिवीगाळ करणारी नव्हती, किमान याचा तरी अभ्यास आजकालच्या आंदोलकांनी करायला हवा.)

Advertisement

Advertisement