Advertisement

संपादकीय अग्रलेख -  या तक्रारीला विचारतो कोण ?

प्रजापत्र | Saturday, 21/09/2024
बातमी शेअर करा

 भाजप नेत्यांना मुस्लिम विरोधी वक्तव्यांची फारशी चीड , संताप असे काही असण्याचे कारणच काय ? त्यांचे राजकारणाचं मुळात वाढले ते अल्पसंख्यांक विरोधावर . बरे राणे कुटुंब देखील तसे धर्मनिरपेक्ष म्हणावे असे कधीच नव्हते. त्यामुळे ते जे काही बोलत आहेत त्यात अनपेक्षित असे काहीच नाही. प्रश्न आहे तो अजित पवारांचा . त्यांना एकाचवेळी भाजपसोबतची सत्ता आणि स्वतःची धर्मनिरपेक्ष मतपेढी दोन्ही सांभाळायचे आहे, हे साधावे तरी कसे ? मग आम्ही तक्रार केली असे सांगून पवार मोकळे होतील, पण असल्या तक्रारींना विचारतो कोण ?
 

भाजप सोबतच्या सत्तेत महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक गोची कोणाची होत असेल तर ती आहे अजित पवारांची. मुळात अजित पवारांनी असंगाशी संग करायलाच नको होता, पण त्यांना सांगणार कोण ? महाराष्ट्रात राष्ट्रवादीला जे काही जनमत आहे ते सारे आपल्यामुळेच असा दांडगा आत्मविश्वास त्यांना वाटलं आणि त्याला हवा देण्याचे काम त्यांच्याच काही निकटवर्तीयांनी केले. त्यामुळे एकदा पहाटेच्या शपथविधीच्या वेळी तोंडघशी आपटण्याचा अनुभव गाठीला असतानाही अजित पवारांनी पुन्हा भाजपसोबत सोयरीक केलीच. हे करताना आमची युती विकासासाठी आहे, आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही असे सांगायचं हट्ट काही अजित पवार सोडायला तयार नाहीत. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवरच आपला पक्ष वाटचाल करणार आहे. आम्ही भाजपसोबत गेलो म्हणून आम्ही धर्मनिरपेक्षता सोडलेली नाही असले बरेच काही अजित पवार आणि त्यांचे निकटवर्तीय बोलत असतात . कारण त्या प्रत्येकाची अडचण आहे ती आपापल्या मतदारसंघातली अल्पसंख्यांक, पुरोगामी, बहुजन मतपेढी . अल्पसंख्यांक आणि आंबेडकरी मतदान विरोधात गेल्यावर काय होते हे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी पहिले आहेच. त्यामुळे आता त्यांना अल्पसंख्यांक समुदाय आपल्यापासून दूर जाणे परवडणारे नाही . काहीही झाले तरी भाजपचा मतदार अजित पवारांना आपले नमानायला तयार नाही आणि आता भाजपसोबत गेल्यामुळे अल्पसंख्यांक देखील दुरावणार असतील तर अजित पवारांची अवस्था 'गाढव ही गेले आणि ब्रह्मचर्य देखील 'यापेक्षा वेगळी कोणती असणार ?

 

पण अजित पवारांच्या या अडचणींशी महायुतीमधल्या इतर पक्षांना काय देणे घेणे असणार ?भाजप काय किंवा शिंदेंची शिवसेना काय, त्यांच्यालेखी हिंदुत्व म्हणजेच निवडणुका जिंकून देण्याचा रामबाण . त्यातही त्यांचे हिंदुत्व म्हणजे अल्पसंख्याकांना, विशेषतः मुस्लिमाना लक्ष करा, त्यांना आव्हान द्या, त्यांचा उपमर्द करा आणि विद्वेषाचे राजकारण करून मतांचे ध्रुवीकरण करा . त्यांचा हा अजेंडा काही आजचा नाही. अगदी १९८९ पासून म्हणजे अडवाणींनी रथयात्रा काढली तेव्हापासूनचा. महाराष्ट्रात भाजप सेनेची युती झाली तीच मुळात याच मुद्द्यावर . त्यामुळे भाजपच्या काय किंवा सेनेच्या काय , नेत्यांना मुस्लिम विरोधी विधानांचे वावडे असण्याचे काहीच कारण नाही. उलट अशी काही विधाने केली तरच आपली मतपेढी सुरक्षित राहील असा दांडगा विश्वास या दोन्ही पक्षांना आहे. म्हणूनच मग राणे काय किंवा आणखी कोणी काय, सातत्याने मुस्लिम विरोधी विधाने करीतच असतात . आता अजित पवार सोबत आहेत म्हणून त्यांना अशी विधाने करण्यापासून कोण रोखणार / मुळात त्या दोन्ही पक्षांना अजित पवारांची अशी काय आवश्यकता आहे ? महाराष्ट्रातील भाजपला अजित पवारांबद्दल प्रेम असे ते कधी नव्हतेच, होता तो विरोधच. आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवारांबद्दल आहे ती असूया . कमी आमदार असतानाही, आणि आवश्यकता नसतानाही त्यांना सोबत घ्यावे लागले आणि वरती उपमुख्यमंत्रीपद आणि त्यातही अर्थखाते द्यावे लागले याची. त्यामुळे आपल्या कोणत्या विधानाने अजित पवारांची गोची होते किंवा कसे याचा विचार करण्याची ना भाजपच्या आणि शिवसेनेच्या वाचाळवीरांमध्ये क्षमता आहे ना त्यांना तशी आवश्यकता आहे.
आता भाजपमधील ,मुस्लिमविरोधी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात अजित पवारांनी थेट अमित शहांकडे तक्रार केली आहे . नितेश राणे यांना आवरावे असे अजित पवारांचे म्हणणे आहे. अजित पवार आपले गाऱ्हाणे अमित शहांकडे घालत असतानाच राज्यातील भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस मात्र 'राणे कुटुंब सुरुवातीपासून हिंदुत्वासाठी काम करत आहे ' असे प्रमाणपत्र देत असतील तर अजित पवारांच्या तक्रारीची भाजपच्या लेखी काय किंमत आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता ती काय ? 

Advertisement

Advertisement