Advertisement

काय सांगता , दिलीप गोरे स्वगृही ? पण त्यांचा मूळ पक्ष तरी कोणता ?

प्रजापत्र | Saturday, 21/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. २० (प्रतिनिधी ) : बीड विधानसभा मतदारसंघातील एक सक्रिय नेते असलेले दिलीप गोरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना 'आपण स्वगृही आल्याचे ' दिलीप गोरे यांनी सांगितले. साडे तीन दशकं सक्रिय राजकारणात असलेल्या दिलीप गोरे यांचा प्रवास अनेक राजकीय पक्षांमध्ये झालेला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगले कामही केले, पण त्यांचा मुक्काम कोठेच फार काळ होऊ शकला नाही. आता दिलीप गोरे स्वतःला स्वगृही आल्याचे सांगत असले तरी त्यांची सुरुवात तशी शिवसेनेची , त्यामुळे स्वगृह नेमके कोणते असा प्रश्न जर कोणाला पडणार असेल तर त्यात वावगे ते काय ?
राजकारणात काही काही व्यक्तींचे प्राक्तन वेगळेच असते. त्यांच्याकडे क्षमता असते, मेहनत घेण्याची तयारी असते, खूप काही करून दाखविण्याची जिद्द आणि आत्मविश्वास देखील असतो, पण ऐनवेळी काही तरी कमी पडते आणि मग त्यांच्या पदरात राजकारणातले हवे ते दान कधी पडत नाही. आमदारकीचे स्वप्न घेऊनच राजकीय वाट चालायला सुरुवात केलेल्या दिलीप गोरेंच्या बाबतीतही असेच काही होत असल्याचे चित्र आजपर्यंत तरी आहे. त्यांना नगराध्यक्षपद मिळाले, जिल्हापरिषदेत सदस्य होता आले, पण अनेकवेळा ,अनेकपक्ष बदलून देखील विधानसभा त्यांना कायम हुलकावणी देत आली आहे. त्या दिलीप गोरेंनी आता नुकताच , म्हणजे कालच शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आज ते स्वगृही परत आल्याचे सांगत आहेत, मात्र राष्ट्रवादी हे काही त्यांचे मूळ घर नाही. त्यांची सुरुवात झाली ती शिवसेनेतून (साधारण १९८७-९० ). त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते त्यावेळच्या काँग्रेसमध्ये गेले. क्षीरसागरांनी त्यांना नगरसेवक केले, नगराध्यक्ष देखील केले. पण दिलीप गोरेंची राजकीय महत्वकांक्षा मोठी होती, ती क्षीरसागरांच्या छायेत पूर्ण होणे अवघड, म्हणून मग ते भाजपात गेले. तेथे त्यांच्याकडे युवामोर्चाची जबादारी आली, त्यांनी खूप शाखा देखील उघडल्या. पण पुन्हा तेच. युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला. मग गोरेंची इच्छा पूर्ण व्हावी ती कशी? त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि गेले राष्ट्रवादीत. तेथे काही वर्ष काढली . आता राष्ट्रवादीत त्यांचे नेते होते दिवंगत विनायक मेटे, मेटे यांच्या कोट्यातून त्यांना राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेचे उमेदवारी मिळाली आणि जयदत्त क्षीरसागरांचा विरोध असतानाही ते निवडणून देखील आले.  नंतर विनायक मेटेंच्या भारतीय संग्राम पक्षाकडून त्यांनी बीड नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली. त्यानंतर शिवसंग्राममध्ये देखील त्यांचे मन रमेना, म्हणून त्यांनी शिवबंधन बांधले मात्र काही महिन्यातच ते बंधन काचू लागल्याने काही महिन्यांपूर्वी त्यांनी थेट आता महाराष्ट्रातील पक्षांपेक्षा बाहेरचा पक्ष बरा असा विचार करत थेट बीआरएसला जवळ केले. मात्र तेथून देखील आपली इच्छा पूर्ण होत नाही याची जाणीव गोरेंना झाली आणि आता त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता या प्रवेशाला दिलीप गोरे भलेही स्वगृही येणे म्हणत असतील , पण सामान्यांनी तसे कसे म्हणावे? त्यांना तर गोरेंचा मूळ पक्ष कोणता हा प्रश्न पडणारच.

Advertisement

Advertisement