बीड दि. २० (प्रतिनिधी ) : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जशी महाराष्ट्राने अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली, तशीच बीड जिल्ह्याने देखील अनुभवली. आज कोणी बीड जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला म्हणत असेल किंवा कोणी शरद पवारांना मानणारा जिल्हा. पण एकेकाळी हाच बीड जिल्हा कम्युनिस्टांचा गड होता आणि १९६७ च्या निवडणुकीत बीड जिल्ह्याने कम्युनिस्ट पक्षाचे चक्क तीन आमदार निवडणून दिले होते, तर दोन मतदारसंघात कम्युनिस्टांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. विशेष म्हणजे या तिन्ही मतदारसंघात तब्बल ५५ % अधिक मते कम्युनिस्ट पक्षाला मिळाली होती.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची पहिली काही वर्ष महाराष्ट्रात सत्तासंघर्ष होता तो काँग्रेस आणि कम्युनिस्ट व शेकाप यांच्यातच. त्यावेळी महाराष्ट्रात जनसंघाचे अस्तित्व फारसे नव्हतेच . काही ठिकाणी त्यांची धडपड सुरु असायची, पण लढत व्हायची ती काँग्रेस आणि लालबावटा अर्थात डाव्या पक्षांची. त्याकाळी बीड जिल्हा म्हणजे डाव्या पक्षांचा बळकट गड मानला जायचा. १९६७ च्या निवडणुकीत देखील डाव्या पक्षांचा प्रभाव तगडा राहिला. त्यावेळी लोकसभेसाठी जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटील यांना भाकपचे उमेदवार म्हणून निवडणून दिले होते, तर त्यांच्यासोबतच विधानसभेत डाव्या पक्षांचे तीन आमदार निवडणून आले होते.
त्यावेळी बीड जिल्ह्यात ७ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असायचा. आताच्या परळी मतदारसंघाचा बहुतांश भाग त्यावेळी रेणापूर मतदारसंघ ओळखला जायचा., रेणापूर जरी आताच्या लातूर जिल्ह्यातले असले तरी या मतदारसंघावर प्रभाव असायचा तो बीड जिल्ह्याचा आणि लोकसभेसाठी या मतदारसंघाचे मतदान असायचे ते देखील बीडमध्येच. तर ६७ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसला चांगली लढत दिली होती. गेवराई मतदारसंघातून एस. ती. पवार म्हणजे शाहूराव पवार , आष्टीमधून एन. व्ही . उगले तर चौसाळा मतदारसंघातून व्ही. ए. दराडे हे भाकपचे उमेदवार निवडून आले होते. विशेष म्हणजे या तिन्ही उमेदवारांना त्या त्या मतदारसंघात ५५ % पेक्षा अधिकची मते मिळाली होती, यावरून त्यावेळी डाव्या पक्षांची असलेली शक्ती सहज लक्षात येऊ शकते.
त्याच निवडणुकीत बीडमधून एस. बी चावरे हे काँग्रेसचे आमदार झाले, तेथे कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. याच निवडणुकीत केशरकाकू क्षीरसागर देखील अपक्ष म्हणून उभ्या होत्या. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर माजलगाव मतदारसंघात सुंदरराव सोळंके हे काँग्रेसकडून विजयी झाले, येथे माकपचे गंगाधर बुरांडे यांचा निसटता पराभव झाला,पुढे हेच गंगाधर बुरांडे जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडणून आले .

बातमी शेअर करा