Advertisement

संपादकीय अग्रलेख - गोबेल्सचे वारसदार

प्रजापत्र | Thursday, 19/09/2024
बातमी शेअर करा

एखादी खोटी गोष्ट देखील पुन्हा पुन्हा सांगितली तर ती खरी वाटू लागते , हुकूमशहा असलेल्या हिटलरचा प्रसिद्धी मंत्री गोबेल्सचे हे तत्वज्ञान. आज त्याच तत्वज्ञानाचा वापर भारतीय राजकारणात होत आहे. असत्या किंवा अर्धसत्य गोष्टी पुन्हा पुन्हा उच्चरवाने देशासमोर मांडून जणू काही तेच अंतिम सत्य आहे असे भासविण्याचा प्रयत्न सध्या भाजपवाले करीत आहेत, विशेष म्हणजे भाजपच्या या मोहिमेला स्वतःला वैचारिक म्हणविणाऱ्या संघटनांचे देखील अप्रत्यक्ष पाठबळ मिळत आहे. गोबेल्सचे हे वारसदार भारतीय राजकारणाला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार आहेत ?
 
राहुल गांधी हे सध्या भाजपची सर्वात मोठी अडचण झालेले आहेत. एकेकाळी ज्या व्यक्तीला पप्पू ठरविण्याचा प्रयत्न केला तीच व्यक्ती आज देशाचा विरोधीपक्ष नेता तर झाली आहेच, मात्र कोणताही आक्रस्ताळेपणा न करता , विरोधकांवर अश्लाघ्य शब्दात वार न करता देखील भाजच्या आणि संघाच्या धोरणांचे अक्षरशः वाभाडे काढण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत. राहुल गांधी हे अदखलपात्र गटातून आज भाजपसाठी डोकेदुखी इथपर्यंत जाऊन पोहचले आहेत. हे त्यांच्यातील पोक्तपणाचे लक्षण. खरेतर विरोधीपक्षातील व्यक्तींच्या देखील चांगुलपणाचे कौतुक करावे ही आपली राजकीय संस्कृती, मात्र आज मोदी शहा आणि भाजपला तसे काही आठवणे किंवा त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच. कौतुक करण्याचा पोक्तपणा जाऊद्या, आता भाजप आणि त्यांच्या सहकारी संघटना पक्ष, राहुल गांधींच्या संदर्भाने खोटे पसरवून त्यांना बदनाम करण्याचा कोतेपणा जोरात करीत आहेत. म्हणूनच या सर्वांच्या संदर्भाने गोबेल्सची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा गोबेल्स हा माहिती मंत्री , त्याने ' एखादी खोटी गोष्ट सातत्याने सांगितली कि लोकांना ती खरी वाटायला लागते ' या तत्वज्ञानाचा शोध लावला आणि त्याचा सर्रास वापर देखील केला. आता भाजपवाले आणि इतर काही , तेच धोरण अवलंबित आहेत.
देशातील आरक्षणाच्या व्यवस्थेसंदर्भाने राहुल गांधी यांनी अमेरिकेत एक विधान केले. त्या विधानात आक्षेपार्ह असे काही नव्हते. मात्र त्या विधानातील केवळ पूर्वार्ध पकडून भाजपने सध्या देशभरात रान उठविले आहे. मुळात आरक्षण धोरणाचा काहीही अभ्यास नसणारे देखील आता वरिष्ठांची आज्ञा म्हणून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणार असतील त्यांच्या कृतीची कीव करण्यापलीकडे काय करता येऊ शकते. राहुल गांधींनी ' जेव्हा प्रत्येकाला समान संधी देणारी व्यवस्था निर्माण होईल, त्यावेळी आरक्षणाची व्यवस्था बदलावी लागेल, मात्र भारतात आजच्या घडीला समान सांधी देणारी व्यवस्था नाही ' असे विधान केले होते, आज राहुल गांधींच्या विरोधात राळ उठविणाऱ्या , त्यांची जीभ चैतन्याची भाषा करणाऱ्या, त्यांच्या जिभेला चटके देण्याची उठवलं भाषा करणाऱ्या किती लोकांनी राहुल गांधी यांचे हे वक्तव्य पूर्णपणे ऐकले आहे. यातल्या किती लोकांकडे राहुल गांधी ज्या भाषेत बोलले ते समजून घेण्याची बौद्धिक कुवत आहे ? मात्र कोणताही विचार न करता भाजपच्या गोबेल्स नीतीला अनुसरून सध्या देशभर राहुल गांधींना खलनायक ठरविले जात आहे आणि विशेष म्हणजे विचारवंत म्हणविणारे 'सम्यक 'वाले देखील या अपप्रचाराला बळी पडत आहेत.
बरे हे एकट्या राहुल गांधींबद्दल होत आहे का तर तसेही नाही. नुकत्याच संपलेल्या गणेशोत्सवाच्या संदर्भाने कर्नाट्कबद्दल काय घडले ? कर्नाटकमध्ये गणपतीची मूर्ती एका पोलीस व्हॅन मध्ये असलेले फोटो व्हायरल झाले आणि लगेच काही अर्धवटरावानी 'बघा बघा कशी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने गणेशपूजेवर बंदी आणली आहे, गणपतीची मूर्ती देखील कशी ताब्यात घेतली आहे ' अशी आवई उठविली. आपल्याकडे मोबाईलच्या स्क्रीनवर आलेले डोक्याचा जराही वापर न करता पुढे ढकलणारे कमी नाहीत , झाले , लगेच कर्नाटक सरकारला धर्मविरोधी ठरवायला सारेच मोकळे. घडले काय होते तर काही आंदोलक गणपतीची मूर्ती  सोबत घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या गदारोळात मूर्तीला काही होऊ नये म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने मूर्ती घेतली आणि रस्त्यावर कोठे ठेवायची म्हणून ससन्मान पोलीस गाडीत ठेवली. पण इतकी माहिती घ्यायला वेळ कोणाला आहे ? तिकडे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाबद्दल असेच खोटे नाटे काहीतरी सुरु असतेच. भाजपच्या गोबेल्स नीतीच्या टूलकिटवर नाचणारे लोक देशाला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार आहेत ? 

Advertisement

Advertisement