Advertisement

अन् ते बिनविरोध झाले होते आमदार

प्रजापत्र | Tuesday, 17/09/2024
बातमी शेअर करा

संजय मालाणी
बीड दि. १६  : आजकाल कोणत्याही निवडणुकीत स्पर्धा प्रचंड आहे. अगदी ग्रामपंचायत देखील बिनविरोध निघणे अवघड. तेथे कोणी विधानसभेत बिनविरोध गेला असेल यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हा राजकीय पराक्रम केला होता तो सुंदरराव सोळंकेंनी.ते वर्ष होते १९७२ चे, त्या निवडणूकीत सुंदरराव सोळंके गेवराई मतदारसंघातून चक्क बिनविरोध विधानसभेवर निवडून गेले होते. आणि त्यांना बिनविरोध करण्यात मोठा वाटा होता तो शिवाजीराव पंडितांचा. 
बीड जिल्हयाने महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच नवेनवे मापदंड दिले आहेत. ७० च्या दशकात असाच मापदंड निर्माण झाला तो विधानसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचा. सुंदरराव सोळंके हे त्यावेळी बीड जिल्ह्याच्या राजकारणातले बडे प्रस्थ. मुळचे माजलगाव तालुक्यातील मोहखेडचे असलेले सुंदरराव सोळंके १९६१ च्या दरम्यान लोकल बोर्डाचे अध्यक्ष राहिलेले. १९६७ ला ते पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढले ती केज मतदारसंघातून, कारण त्यावेळी माजलगाव मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता. ६७ मध्ये सुंदरराव सोळंके केज मधून जिंकले, मंत्री देखील झाले. पुढे ७२ ची निवडणूक आली. माजलगाव मतदारसंघाचे आरक्षण कायम होते, तर केज मधून बाबुराव आडसकर इच्छुक होते. त्यामुळे सुंदरराव सोळंकेंसमोर मतदारसंघाचा प्रश्न होताच. इकडे गेवराईत त्यावेळी शिवाजीराव पंडीत राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांना 'जय भवानी' कारखान्याची उभारणी करायची होती. त्यावेळी शाहुराव पवार हे पंडितांचे राजकीय विरोधक. 
आपल्याला कारखाना उभारायचा तर कोणत्यातरी वजनदार नेत्याचे वजन आपल्या बाजुने असायला हवे म्हणून त्यांनी मग थेट सुंदरराव सोळंकेंनाच गेवराई मतदारसंघात येण्याचे निमंत्रण दिले. नवखा मतदारसंघ असल्याने सुंदरराव जरा संभ्रमात होते, पण शिवाजीराव पंडितांनी त्यांना शब्द दिला तो बिनविरोध निवडून आणण्याचा. शाहुराव पवार काय करणार हा प्रश्न होताच, पण ती जबाबदारी शिवाजीराव पंडितांनी घेतली आणि आपले राजकीय वैर विसरून शिवाजीराव पंडित शाहुरावांच्या भेटीला गेले. या भागाच्या विकासासाठी कारखाना आवश्यक आहे आणि त्यासाठी सुंदरराव सोळंके यांना बिनविरोध निवडून दिले पाहिजे असा प्रस्ताव ठेवला. काही शब्द, काही वचन दिली घेतली. शाहुरावांनिही मन मोठं केलं आणि मग गेवराई मतदारसंघातून सुंदरराव सोळंके बिनविरोध आमदार झाले. पुढे ते मंत्री झाले. त्यातून ७३ साली जय भवानी कारखान्याची नोंदणी झाली, ७४ ला कारखाना सुरु झाला. 
नंतर १९७८ ची विधानसभा निवडणूक सुंदरराव सोळंकेंनी माजलगाव मतदारसंघातून लढविली. जिंकली आणि त्याच काळात शरद पवारांच्या मंत्रीमंडळात ते २ वर्ष उपमुख्यमंत्री होते. माजलगाव प्रकल्प, कुंडलिका प्रकल्प आणि इतर मोठ्या योजना त्यांना राबविता आल्या. दोन वर्षातच शरद पवारांचे सरकार गडगडले, सुंदरराव सोळंकेंनी पवारांची साथ सोडली आणि ८० च्या निवडणुकीत माजलगाव मधून गोविंदराव डकांनी त्यांचा पराभव केला. यासाठी म्हणे शरद पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यानंतर सुंदरराव सोळंके सक्रिय राजकारणातून बाजुलाच झाले. आज त्याच सुंदरराव सोळंके यांची जयंती. तेंव्हाचे राजकारण आणि राजकारणी सारेच वेगळे होते. आता ते उरलेय फक्त आठवणीत.

Advertisement

Advertisement