डी. डी. बनसोडे
केज दि.१२ - विधानसभेची निवडणूक जाहीर होण्या अगोदरच राज्यात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. येत्या काही दिवसात निवडणूक आयोग अधिकृत घोषणा करेलही परंतु सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आणि त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू दिसत आहे. मात्र यामध्येही काही मोजकेच इच्छुक उमेदवार हे अगदी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे केज विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. अंजली घाडगे होय. त्यांच्या संपर्क दौऱ्यात सध्या मतदारसंघातील दुर्लक्षित घटक त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे.
येत्या काही दिवसातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. अद्यापही वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. परंतु जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते अंग झटकून कामाला लागलेले आहेत. काहीजण निवडणुकीच्या तोंडावर मतदार संघात येऊन गाजावाजा करण्याचा प्रयत्न करत आहेत केज विधानसभा मतदारसंघात मागच्या 2014 पासून मतदारांच्या कायम संपर्कात असलेलं एक नाव म्हणजे डॉक्टर अंजली घाडगे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणामध्ये वाढलेल्या डॉ. अंजली घाडगे यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
मागच्या दोन महिन्यांपासून डॉ. घाडगे यांनी मतदार संघातील अतिशय दुर्लक्षीत वाड्या - वस्त्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा ठिकाणी राहणाऱ्या मतदारांनाही कधी नव्हे ते आपल्याकडे कुणीतरी आले हे बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. केज आणि आंबेजोगाई तालुक्यातील तसेच नेकनूर परिसरातील डोंगरदऱ्यामध्ये राहणारे जे केज विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार म्हणून आहेत अशा बहुतांश ठिकाणी डॉ. घाडगे पोहोचलेल्या आहेत. आणि आज जरी त्या सत्तेत नसल्या तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांचा प्रश्न ऐकून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदार संपर्क दौऱ्या दरम्यान डॉ. घाडगे यांना अनेक भावनिक प्रसंग येत आहेत. आणि याचे उदाहरण म्हणजे अतिशय वंचित समाजातील महिला पुरुषांनी केलेला त्यांचा हृदय सत्कार...! मागच्या चार दिवसांपूर्वी मतदार संपर्क दौऱ्या दरम्यान डॉ. घाडगे या तालुक्यातील वरपगाव येथे असलेल्या पारधी समाजाच्या वस्तीवर पोहोचल्या. कुणीतरी आपली दखल घ्यायला येत आहे हे पाहून अक्षरशा तिथल्या तरुणांनी डॉ. घाडगे यांची हलगीच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढली. आणि मोठ्या मनाने त्यांचे स्वागत केले. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी असलेल्या महिलांनी एक महिला आपल्याला भेटायला आली हे पाहून समस्यांचा पाढा वाचला. आणि आतापर्यंत एखाद दुसरी वेळ वगळता आमच्याकडे कुणी आलंच नाही अशी भावनिक आणि हक्काची तक्रारही केली. हे पाहून डॉ. घाडगे यांचेही मन अगदी हेलावून गेले आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला. तर सध्या केज शहरात मोठ्या प्रमाणावर गौरी गणपती सजावट आणि आरास स्पर्धा आयोजीत करण्यात आल्यामुळे घराघरात डॉ. घाडगे यांची चर्चा सुरू असून महिलावर्ग उत्साहात आहे.जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस असून भरीव काम करण्याची त्यांची इच्छा असल्याचे घाडगे यांनी बोलून दाखवले.
मतदार संघातील अशा अनेक ठिकाणी डॉ.घाडगे यांना असे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे आमदार झाल्यानंतर अशा वंचित घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची त्यांची तळमळ दिसून येते. आणि एवढेच नव्हे तर आज घाडगे ज्या पक्षाचे काम करत आहेत त्या पक्षाचे नेते सुद्धा घाडगे यांच्या कामाची दखल घेत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत डॉ.घाडगे ह्या प्रबळ उमेदवार ठरणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे.