Advertisement

एमआयएमची महाविकास आघाडीला ऑफर

प्रजापत्र | Monday, 09/09/2024
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर दि. ८ (प्रतिनिधी ) :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीत राजकीय पक्षांनी झोकून दिले आहे. प्रत्येक मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू असून, राज्य पातळीवर दोन्ही आघाड्या ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशात असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमने महाविकास आघाडीत सामील होण्याची तयारी दर्शवली असून, तसा प्रस्ताव मविआला दिला आहे. मात्र, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर लढू, असा इशाराही एमआयएमने दिला आहे.  
एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, "आमच्या आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारसरणीत मतभेद आहेत. तरीही राजकीय तडजोड म्हणून आम्ही शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीत असताना आघाडी करण्यास तयार आहोत. आम्हाला राज्यातील शेतकरी आणि लोकांचे हित महत्त्वाचे वाटते. ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची स्थिती मजबूत आहे, त्या जागा आम्ही लढवणार, असा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे. आता आम्हाला मविआकडून उत्तराची अपेक्षा आहे."
इम्तियाज जलील यांनी जागा लढवण्यासंदर्भात सांगितले की, "एमआयएम राज्यात किती जागा लढवणार, हे आम्ही अजून निश्चित केलेले नाही. आता आम्ही आढावा घेत आहोत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने ४४ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन ठिकाणी पक्षाला यश मिळाले."
 माजी खासदार जलील म्हणाले की, "आम्ही महाविकास आघाडीच्या उत्तराची ९ सप्टेंबरपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही आमच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्यास सुरूवात करू. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने महाराष्ट्रात सरकार बनवू नये अशी आमची इच्छा आहे", असेही जलील यावेळी म्हणाले.

Advertisement

Advertisement