Advertisement

बारामतीतून न लढण्याचे अजित पवारांचे पुन्हा संकेत?

प्रजापत्र | Sunday, 08/09/2024
बातमी शेअर करा

पुणे : बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला एकमुखी विरोध केला.  अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिलंय का अशी चर्चा सुरू आहे.

या आधीही अजित पवारांनी ते बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. आताही तशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अजित पवार भावनिक राजकारण करत असल्याची चर्चा आहे. बारामती लोकसभेतील सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं या वक्तव्यावरून दिसतंय अशी चर्चा आहे. 

 

 

काय म्हणाले अजितदादा? 
एकदा बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. मग त्यावेळी माझी 1991 ते 2024 पर्यंतच्या कामाची तुलना करा. त्यावेळी 1991 पासूनच्या माझी कामं तुम्हाला कळतील. मीही आता 65 वर्षांचा झालो. बारामतीत मी वेगळी भूमिका घेतली नाही तरीही पराभव झाला. बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल. मी केलेली कामं तुम्हाला कळतील. 

सकाळपासून उठून कामं करावी लागतात पण काही जण आमची चेष्टा करतात, त्याच्याबद्दल म्हणनं काही नाही, जे आहे ते आहे, असं अजित पवार म्हणाले. ही बारामतीच्या भवितव्याची निवडणूक आहे, सत्तेत असू तर अर्थकारणाला गती मिळणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

 

 

काम करूनही अजितदादांना वेदना 
अजित पवारांच्या या वक्तव्यावर त्यांच्या गटाचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एखाद्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरातील व्यक्तीला जनता पराभूत करते त्यावेळी त्याला वेदना होतात. अजितदादांनी बारामतीचा मोठा विकास केला. तो विकास पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. अजितदादा सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत काम करतात. 

 

 

शरद पवार गटाची प्रतिक्रिया काय? 
पवार साहेबांना सोडल्यानंतर त्यांची किंमत काय हे आता अजितदादांना समजलंय. पवार साहेबांनी अजितदादांच्या ताब्यात पूर्ण पक्ष दिला. पण त्याचा गैरवापर अजितदादांनी केला. तुम्हाला जर आता पश्चाताप झाला असेल तर पक्ष पुन्हा एकदा पवार साहेबांच्या ताब्यात द्यावा अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते महेश तपासे यानी दिली. 

Advertisement

Advertisement