Advertisement

संपादकीय अग्रलेख - बौद्धिक पचणार का ?

प्रजापत्र | Thursday, 05/09/2024
बातमी शेअर करा

 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मर खाल्ल्यामुळे असेल कदाचित, पण आगामी विधानसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर महाराष्ट्रात भाजपला 'संघ ' शरण जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपवाले संघाशी 'जुळवून ' घेण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र 'निष्ठवंतानाच संधी द्या ' इथपासून 'इतर पक्षातून लोक आयात करू नका' इथपर्यंतचे संघाचे 'बौद्धिक ' आजच्या सत्तापिपासू भाजपला पचणार आहे का ?
 

लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपला आता संघाची फारशी गरज नाही अशा आशयाचे विधान केले होते. संघ भाजपच्या संघटनात्मक बाबींमध्ये आणि सरकार चालविताना देखील जे काही उपदेशाचे डोस देतो, त्याचे बहुधा त्यावेळी भाजपला अजीर्ण झाले असेल, त्यामुळे नड्डा कदाचित तसे बोलले असतील असे समजूया. पण लोकसभा निवडणुकीत भाजपचा स्वतःबद्दलच्या भ्रमाचा भोपळा फुटला. 'मोदी वाक्य प्रमाणम ' म्हणून देखील स्पष्ट तर सोडाच साधे बहुमत देखील मिळविता येत नाही याचा साक्षात्कार भाजपला झाला , आणि आता महाराष्ट्रासारख्या राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे तर संघाची साथ आवश्यक आहेच याची देखील जाणीव भाजपला झाली आहे. त्यामुळेच आता भाजपमधून संघाशी 'समन्वय ' वाढविण्याच्या हालचाली सुरु आहेत.
संघ स्वतःला जरी अराजकीय म्हणवत असला तरी संघाने कायमच आपल्या स्वयंसेवकांचे बळ कोणाच्या मागे उभे केलेले आहे हे लपून राहिलेले नाही. किंबहुना संघाला भाजप शिवाय इतर कोणी 'आपला ' वाटत नाही, भाजपने कितीही दुगाण्या झाडल्या तरी संघाचे प्रेम असते ते भाजपवरच , हे देखील राजकीय वास्तव आहे. त्यामुळेच आता भाजप आणि संघातील 'समन्वय ' सत्र सुरु झाले आहे. संघाने भाजपसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली खरी, पण संघाच्या 'तत्वांनी ' निवडणूक लढविणे भाजपला राज्यात कितपत जमणार आहे हा मोठा प्रश्न आहे.
मागच्या काही काळात, विशेषतः एक दीड दशकातला भाजप, हा वाजपेयी अडवाणींचा भाजप राहिलेला नाही. गैरमार्गाने मिळणारी सत्ता नको असे म्हणणारे नेते आता भाजपची ओळख नाही, तर 'सत्ता सर्वार्थ साधनम ' हीच भाजपची संस्कृती झाली आहे. इतर पक्षातील एकेकाळी भाजपनेच 'कलंकित ' ठरविलेल्या नेत्यांना पक्षात घ्यायचे आणि त्यांनाच उमेदवारी द्यायची, त्यांनाच सत्तेची पदे द्यायची आणि त्यातून भाजप किती आणि कसा वाढला आहे हे दाखवायचे असेच धोरण भाजपचे राहिलेले आहे. महाराष्ट्रात आज भाजमध्ये जे कोणी आहेत, भाजपने ज्यांना मंत्रीपदे दिली, त्यातील मूळ भाजपचे किती हे शोधण्याचा प्रयत्न केला तर वास्तव समोर येऊ शकते. अशावेळी जर संघ परिवार भाजपला 'निष्ठावंतांना तिकिटे द्या ' म्हणणार असेल तर ते ऐकायला बरे असले तरी त्याची अंमलबजावणी करणार कशी ? महाराष्ट्रातले विखे काय, पिचड काय , अगदी चव्हाण काय किंवा आणखीही कोणी , भाजपात आले तेच सत्तेचा स्वाद चाखता यावा म्हणून. यात अगदी धाराशिवच्या राणा जगजीतसिंहांपासून अनेकांची नावे घेता येतील. हे इतर पक्षातून भाजपात आले, त्यांनी त्या त्या भागातला मूळ भाजप संपविला आणि खऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याचे देखील काम शिल्लक ठेवले नाही, तेव्हा आता या साऱ्या 'शिरजोर ' झालेल्या पाहुण्यांना रोखायचे कसे ? आणि खरोखर निष्ठावंतांना संधी द्यायची तर त्यांच्यात निवडणूक लढवायची शक्ती उरली तरी आहे का ? कारण भाजपच्या सत्ताकाळात त्यांना असे कितीसे बळ मिळाले ?
बरे संघ परिवाराची दुसरी शिकवण 'असंगाशी संग नको ' अशी. मग अजित पवारांचे करायचे काय ? आजच्या राजकीय परिस्थितीत एकट्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची हिम्मत भाजपमध्ये नाही. त्यांचा 'शत प्रतिशत 'चा अहंकार कधीच गाळून पडलाय . बरे संघ परिवाराला भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे, मग एकनाथ शिंदेंना भाजपच्या 'महाशक्तीने ' दिलेल्या शबदांचे काय ? मग एकनाथ शिंदे, अजित पवार आदी साऱ्यांनाच नाराज करायचे असेल तर केवळ संघाच्या जोरावर भाजपला अशा किती जागा जिंकता येणार ? अशा साऱ्याच प्रश्नांचा विचार संघाला करायचा नसला तरी भाजपला करावाच लागणार आहे . त्यामुळे संघाचे बौद्धिक कितीही तात्विक असले तरी भाजपला ते पचावे कसे ? 

Advertisement

Advertisement