इतिहासातील प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे कंगोरे असतात . मात्र असे असले तरी ऐतिहासिक गोष्टी नाकारण्यात अर्थ नसतो, त्या प्रसंगाचे अर्थ भलेही वेगवेगळे काढता येतीलही, पण म्हणून 'असे घडलेच नाही ' असे म्हणणे आणि ते देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भाने , हे जरा अतीच झाले . आज कदाचित गुजरातबद्दल काही बोलण्याची भीति महाराष्ट्राच्या राजकारण्यांना वाटत असेलही, पण म्हणून इतिहासच नाकारणे ही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचीच लूट आहे
महाराष्ट्रात मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यातच कोसळला आणि आता त्या नाचक्कीतून बाहेर कसे पडायचे हे महायुतीला कळायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आणि सन्मान आहेत, आणि म्हणूनच कोणी कितीही 'याचे राजकारण करू नका' असे म्हटले तरी अस्मितेला धक्का लावण्याची राजकीय किंमत चुकवावी लागणारच . म्हणूनच कदाचित या घटनेचे संतप्त पडसाद उमटू लागल्यानंतर यावरून माफी मागण्याचे सत्र सुरु झाले आणि उशिरा का होईना देशाच्या पंतप्रधानांनी याबद्दल माफी मागितली. मात्र हे प्रकरण थंड होत नाही तोच, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना आता शेकडो वर्षांपासून शाळेत शिकविला जात असलेला, अगदी आतापर्यंत संघ परिवाराच्या 'मशाल सत्रांमधून ' सांगितलं गेलेला, चारुदत्त आफळेंसारख्या हिंदुत्ववादी कीर्तनकारांनी सांगितलेला इतिहास देखील खोटा असल्याचे 'दिव्यज्ञान ' झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा नव्हे तर दोन वेळा सुरतेवर स्वारी केली. त्याला कोणी सुरतेची लूट म्हणेल, कोणी सुरतेची 'बेसुरात ' म्हणेल, पण महाराजांनी सुरतेपर्यंत धडक मारली हे ऐतिहासिक सत्य. बरे हे काही आजचे नवे निष्कर्ष नाहीत. या प्रसंगाची नोंद इतिहासात वेगवेगळ्या ठिकाणी आहेच, पण शाळेपासून महाविद्यालयांपर्यंत अनेक दशके हा इतिहास शिकविला गेला आहे. इतिहासाचे भगवेकरण करण्याचे जे प्रयत्न अगोदर अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झाले, त्यावेळीही कधी कोणाला 'सुरतेची लूट ' अनैतिहासिक वाटली नव्हती. बरे हेच देवेंद्र फडणवीस पाच वर्ष राजाचे मुख्यमंत्री होते, त्याकाळात त्यांना कधी हा 'चुकीचा इतिहास ' आठवला नाही. बरे देवेंद्र फडणवीस आणि भाजपेयींना वंदनीय असणाऱ्या सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री दाक्षिण्याची 'सद्गुण विकृती ' म्हणून संभावना केली, त्या सावरकरांनी देखील कधी सुरतेची लूट नाकारली नाही , मग देवेंद्र फडणवीसांना आताच हा इतिहास खोटा का वाटू लागला ?
इतिहासातील प्रसंगांमधून एक प्रेरणा घ्याची असते, शिवचरित्रातून देखील ती प्रेरणा जगणे घेतली आहे. सुरतेच्या लुटीतून बलाढ्य शत्रूला त्याच्या गोटात जाऊन नामोहरम करता येते हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले होते, यात खरेतर प्रादेशिकता वाद आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती, मात्र आताशा गुजरातबद्दल काहीही बोलण्याची हिम्मतच कोणी दाखवायची नाही, नाहीतर नरेंद्रांची खप्पा मर्जी होईल असेच चित्र देशभरात आहे. विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्रासमोर दिल्ली देखील मान तुकवायची तो महाराष्ट्र आता गुजरातसमोर हतबल होतोय हेच चित्र आज आहे. गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळविले, महाराष्ट्राचा रोजगार पळविला, महाराष्ट्रात आज मोठ्याप्रमाणावर कंत्राटदार गुजरातेतून येत आहेत, आता 'राष्ट्र प्रथम ' म्हणून त्याला विरोध करण्याचे देखील कारण नाही, पण उद्योग आणि रोजगार पळविले म्हणून आता गुजरातला आता महाराष्ट्राचा स्वाभिमान देखील पळवू द्यायचा का असा प्रश्न आहे ? सशिवाजी महाराजांनी सूत्रतेची लूट केली या ऐतिहासिक सत्याला नाकारून नेमके काय साधले जाणार आहे? जर मुघलांची असलेली व्यापारपेठ शिवाजी महाराजांनी त्यावेळी बेसुरात केली होती, तर त्यामुळे आता गुजरातच्या कोणाला 'डागण्या ' बसत आहेत आणि त्याच्या वेदना देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर उमटत आहेत हे महाराष्ट्राला कळायला हवे.
मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेताना प्रसंगांपेक्षाही त्या प्रसंगातून महाराजांनी काय शिकविले याच दृष्टीने पाहणे अपेक्षित आहे. मग सुरतेच्या लुटीचा आज भाजपला काय त्रास होत आहे? इंद्रजित सावंतांसारखे इतिहासतज्ञ देखील ज्या घटनेला ऐतिहासिक मानतात, त्या नाकारण्याइतका इतिहासाचा गाढ अभ्यास देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या भाजपने कधी केला ? भाजपवाले हे सांगणार आहेत का ? किमान भाजपच्या वळचणीला गेलेल्या खा. उदयनराजे आणि संभाजी राजे यांना तरी याबद्दल काही बोलावे वाटणार आहे का ? आज जो इतिहास भाजप नाकारू पाहत आहे, तो प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लूट आहे आणि गुजरात्यांच्या भीतीने आम्ही आमचे पराक्रम देखील नाकारायचे असाच प्रकार आहे. हा महाराष्ट्राच्या मराठी मनासोबत , मराठी मातीसोबतचा 'स्वाभीमन द्रोह ' नाही का ? उद्या आणखी कोणता कोणता इतिहास देवेंद्र फडणवीस आणि भाजपला चुकीचा वाटणार आहे?