बीड: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दैदीप्यमान आहे. त्यांच्या पुतळयाच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी. चुक ती चुकच, त्याला माफी नाही. कोणी काम केलं, कोणाची चूक, ते महत्वाचं नाही, यावर कारवाई होणारच. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथे जनसन्मान यात्रेदरम्यान केले. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे,माजी आ. अमरसिंह पंडीत,जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण,आ. विक्रम काळे, रुपाली चाकणकर, राजकिशोर मोदी,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे,अशोक डक, जयसिंह सोळंके, रेखा फड यांच्यासह डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यांची यावेळी उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे आगमन गुरुवारी बीड जिल्ह्यात झाले. बीडमध्ये अजित पवारांचे बाईक रॅलीने स्वागत झाल्यानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले हे राज्य सामान्यांचं,गरिबांच आहे. आमच्या योजनांची किंमत गरिबांनाच कळेल. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना हे कळणार नाही.
आम्ही सामान्यांचा विकास करतोय,पण विरोधक आमची चेष्टा करतायत. आम्हाला निवडून द्या, पुढची पाच वर्ष या योजना चालवू. निधी कसा आणायचा हे आम्हाला माहित आहे. रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परळीत धनंजय मुंडे यांनी कृषी महोत्सव घेतला, तिथं आम्ही कांदा निर्यात बंदी करायची नाही असं सांगितलं. आम्ही बळीराजासाठी, त्याच्या घामाची किंमत मिळावी म्हणून उभे आहोत.
महिला अत्याचाराला माफी नाही. दोषी कोणीही असो त्याला सोडणार नाही. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणालाही पाठीशी घालणार नाही. आम्ही सत्तेला हपापलेले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दैदीप्यमान आहे. त्यांच्या पुतळयाच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी. चुक ती चुकच, त्याला माफी नाही. कोणी काम केलं, कोणाची चूक, ते महत्वाचं नाही, यावर कारवाई होणारच. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असे पवारांनी सांगितले.
मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेत बीड जिल्हा राज्यात तीसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. या सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली. सामान्यांसाठी सरकारची तिजोरी खाली केली. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हयात राष्ट्रवादीचे चार तर महायुतीचे सहा आमदार असतील अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविकात पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी एक वर्षाच्या कमी कालावधितही अजित पवारांच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. तसेच मराठा भवनासाठी निधी देण्यासह उर्दू घर, शेतकऱ्यांसाठी सोलार योजना, मोठया गावांमध्ये व्यायामशाळा, बीड शहरातील प्रलंबित रस्ते आणि बीड शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याच्या मागण्या केल्या.
प्रजापत्र | Thursday, 29/08/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा