मुंबई- किडनी निकामी झालेल्या मेघराज कापडने (वय ४१) यांना मोठी बहीण संजना पानपाटील हिने किडनी दान करून त्याचे प्राण वाचवले. किडनीचा गंभीर आजार असल्याने सर्वसामान्य आयुष्य जगण्यासाठी मेघराज याच्यापुढे किडनी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता. त्याचवेळी संजना हिने किडनी देऊन भावा-बहिणीचे नाते खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले आहे.
मेघराज कापडने हे आयटी प्रोफेशनल आहेत. कोविड काळात ते घरातून काम करत होते. सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र, अचानक त्यांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेथे त्यांना काही वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगण्यात आले; मात्र त्यातून काहीच निदान झाले नाही. त्यानंतर ते नेफ्रोलॉजिस्टकडे गेले.
तेथे केलेल्या तपासण्यांत त्यांना किडनीचा त्रास असल्याचे समजले. त्यानंतर औषधोपचारांसह आहाराचे पथ्य सुरू झाले. मात्र, त्यांची स्थिती अधिकाधिक खालावली. त्यानंतर मेघराज यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा पुन्हा सल्ला घेतला. तपासणीत त्यांची किडनी काम करत नसल्याचे लक्षात आले. त्यावर त्यांना डायलिसिसचा सल्ला देण्यात आला; मात्र हे मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप त्रासदायक होते. अखेर त्याला प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवण्यात आला. त्यांच्यासमोर प्रश्न होता तो किडनी दान कोण करणार?
अशा वेळी मेघराज यांची मोठी बहीण संजना पानपाटील (वय ४७) या किडनी दानासाठी पुढे आल्या. त्यानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रत्यारोपणापूर्वी त्याला स्टिरॉइड्स देण्यात आले. त्यामुळे क्रिएटीन कमी होण्यास मदत झाली.
मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील वैद्यकीय टीम, नेफ्रोलॉजी विभागाचे संचालक व किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. हरेश दोडेजा यांच्या मार्गदर्शखाली नुकतीच शस्त्रक्रिया करून मेघराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बहिणीने दिलेल्या या अनोख्या ओवाळणीमुळे मेघराज हे आता सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.
प्रत्यारोपणानंतरचा टप्पा माझ्या कुटुंबीयांसाठी आव्हानात्मक काळ होता. तीन महिन्यांसाठी बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला आहे. आता मी ठणठणीत आहे. माझ्या बहिणीने माझ्यासाठी जे केले आहे, ते मी कधीच विसरू शकत नाही. यंदाचा रक्षाबंधन आमच्यासाठी खास आहे, असं मेघराज कापडने म्हणाला.
रुग्णाच्या किडनी विकारासाठी बालपणी झालेला संसर्ग कारणीभूत असू शकतो; पण दोन्ही किडन्या निकामी होण्यामागील कारण अद्याप समजलेले नाही. किडनी विकारांची वाढ संथगतीने होते. त्यामुळे त्याचे लवकर निदान होत नाही, असं नेफ्रॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. हरेश दोडेजा म्हणाले.