धारूर दि.१५ (प्रतिनिधी)- तालुक्यातील कासारी येथील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता चांगली असताना मुख्यध्यापकासह दोन शिक्षकाची पदे रिक्त आहेत. ती तात्काळ भरण्याची मागणी करून देखील शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने पालक व ग्रामस्थानी शाळेला कुलुप ठोकले. रिक्त पदे भरल्या शिवाय कुलूप न उघडण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.
सविस्तर माहिती अशी की, धारुर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासारी केंद्र देवदहीफळ येथील शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून एकूण पटसंख्या २२४ आहे. या शाळेत अकरा पदांपैकी दोन प्राथमिक पदवीधर व एक श्रेणी मुख्याध्यापक पद रिक्त असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून विविध स्पर्धा परीक्षासह शालेय उपक्रम क्रीडा स्पर्धा या शाळेची कामगिरी चांगली आहे. संपूर्ण तालुक्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी गुणवत्ता पूर्ण शाळा असल्याची ओळख आहे. तरी यासाठी अनेक वेळा गटशिक्षणाधिकारी कार्यालय धारूर येथे फोनवर प्रत्यक्ष भेटून आणि शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव दि. २६ जून रोजी देऊन शिक्षकांची मागणी केली. याची दखल न घेतल्यामुळे परत दुसऱ्या वेळेस दि. ९ जुलै शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव देऊन शिक्षक देण्याची मागणी केली व शिक्षक नाही दिलेत तर शाळेला कुलूप ठोकण्याचा इशाराही दिला. तरीसुद्धा प्रशासनाने याचीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आज दि. १५ जुलै सोमवार रोजी शाळेला कुलूप ठोकण्यात आले.