बीड-आष्टीतील ईदगाह मैदान येथे उद्या सकाळी 11 वाजता शरद पवार यांची जाहीर सभा होणार होती. मात्र तब्येतीच्या कारणास्तव ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येतं आहे.महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
बजरंग सोनवणे यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये भावनांना वाट मोकळी करून देताना म्हटले आहे 'साहेब, तब्येतीला जपा!
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..
तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.
लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.' असे म्हटले आहे. त्यामुळे उद्याची नियोजित सभा रद्द झाल्याची माहिती आहे