अंबाजोगाई - पत्नी बाहेर नोकरी करत असल्याने आणि घटस्फोटाची तक्रार दिल्याच्या रागातून दारुड्या पतीने पत्नीच्या पोटात चाकूने भोसकले. प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. हि खळबळजनक घटना अंबाजोगाई शहरातील अंबिका कॉलनीत सोमवारी (दि.३०) रात्री घडली.
भाग्यश्री मयूर शर्मा (वय ३८, रा. अंबाजोगाई) असे त्या जखमी पत्नीचे नाव आहे. बारा वर्षापूर्वी भाग्यश्रीने घरच्यांचा विरोध झुगारून मयूर बाबूलाल शर्मा (सध्या रा. छत्रपती चौक, अंबाजोगाई) याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मयूरची बहिण कोमल पंचारिया यांच्या फिर्यादीनुसार, मागील सहा वर्षापासून मयूर दारूच्या आहारी गेला आहे. त्यामुळे मयूरचा पत्नी भाग्यश्री आणि आई-वडिलांसोबत सतत वाद होत होता. त्यातच भाग्यश्री बाहेर नोकरी करू लागल्याने त्याचा तिच्यावर राग असायचा. मागील वर्षभरापासून ती एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती. मयूरच्या त्रासाला कंटाळून भाग्यश्री काही दिवसापासून ‘मानवलोक’ संस्थेच्या मनस्विनी प्रकल्पात राहत होती आणि तिथूनच तिने मयूर विरुद्ध घटस्फोटाची तक्रार दिली होती. सोमवारी रात्री ८ च्या
सुमारास मयुरने भाग्यश्रीला रुग्णालयाच्या बाहेर बोलावले आणि ते दोघे अंबिका कॉलनीतील हनुमान मंदिराकडे गेले. तिथे मंदिरासमोर मयूरने सोबत आणलेला चाकू बाहेर काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने भाग्यश्रीच्या पोटात भोसकले आणि निघून गेला. हा वार एवढा भयंकर होता कि भाग्यश्रीच्या पोटातील आतडी बाहेर आली. भाग्यश्री काम करत असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला जखमी अवस्थेत तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे भाग्यश्रीवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून अद्यापही तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याप्रकरणी कोमल पंचारिया यांच्या फिर्यादीवरून मयूर शर्मा याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास एपीआय जाधवर करत आहेत. दरम्यान, हल्ला करून मयूर शर्मा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बहिणीलाही दिली जीवे मारण्याची धमकी
केवळ पत्नीवरच प्राणघातक हल्ला करून मयूर थांबला नाही. त्यानंतर त्याने बहिण कोमल यांना कॉल केला आणि ‘मी तिचे काम केलंय, आता तुझा नंबर आहे, मी तुला दाखवतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या बहिणीने पतीसोबत अंबाजोगाई गाठून भावा विरोधात तक्रार दिली.