पाटोदा-तालुक्यातील सौताडा येथे धबधब्याच्या बाजूला एका झाडाला लटकलेला अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदरील तरुणाने आत्महत्या केली की, त्याचा खून झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
सौताडा रामेश्वर हे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले आहे. येथील निसर्गरम्य धबधबा तसेच श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये-जा करतात. ८ जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास सौताडा वनखात्यातील वनरक्षक भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे हे नेहमी प्रमाणे जंगलात गस्त घालत असताना त्यांना मंदिराच्या उजव्या बाजूला छोट्या धबधब्याजवळ एका झाडाला अज्ञात व्यक्तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. हा मृतदेह अर्धा झाडाला तर अर्धा खाली पडलेला होता. त्यामुळे हा खून की, आत्महत्या अशी चर्चा आहे. अंगावर तीन गुडीचा शर्ट, धोतर, डोक्याला पंचा असा पेहराव असून साधारण ५५ ते ६० वय आहे. या प्रकरणी पाटोदा पोलीसात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा