Advertisement

 निवडणुकीच्या मैदानात मी पैलवान म्हणून उतरणार

प्रजापत्र | Tuesday, 23/04/2024
बातमी शेअर करा

राज्यातील लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विखे-पाटील यांच्याविरोधात निलेश लंकेंन दंड थोपटलेत. आपण या निवडणुकीत पैलवान म्हणून उतरणार असल्याचं प्रतिपादन लंके यांनी केले आहे.

 
महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिव्यांग बांधवांच्या हस्ते लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आज हनुमान जयंती असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना गदा भेट दिली. यावरून त्यांनी विरोधक सुजय विखे-पाटील यांना इशारा दिलाय.

 

 

हनुमानाची गदा आहे आणि हनुमानाची गदा पैलवानाला दिली जाते. हनुमानाने मला निवडणूक लढवण्याचा बळ द्यावं मीही पैलवान आहे, या निवडणुकीच्या मैदानात आता मीही पैलवान म्हणून उतरणार असल्याचं प्रतिपादन लंकेंनी केलं. ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचे असून आर्थिक आणि सत्तेचा गैरवापर केला जाणार असल्याचा आरोप सुद्धा लंकेंनी यावेळी केला.दरम्यान आज शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज मोठी रॅली न काढता आपला अर्ज भरला. आज हनुमान जयंती असल्याने सर्वत्र हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहेत. तसेच कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रॅली न काढता उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

 

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना निलेश लंके यांच्यावर तोफ डागली होती. उद्या हनुमान जयंती आहे, यामुळे जनतेने लंका दहन करण्याचा निश्चिय करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. यावर निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिलीय. विरोधक लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी अशाप्रकराचे विधानं करत असतात. ते विधान करताना ते कोणत्या मानसिकतेतून म्हणत होते. ते त्यांना माहिती नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते मी ऐकले नाही. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करू शकत नाही असं लंके म्हणाले.

Advertisement

Advertisement