Advertisement

वंचितने परभणीतील उमेदवार अचानक बदलला

प्रजापत्र | Thursday, 04/04/2024
बातमी शेअर करा

परभणी-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष जाहीर केलेले उमेदवार मागे घेऊन नव्या चेहऱ्यांची घोषणा करत आहेत. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीवर आहे. कारण, गेल्या काही दिवसांमध्ये वंचितकडून घोषणा करण्यात आलेला तिसरा उमेदवार बदलण्यात आला आहे. वंचितने गुरुवारी परभणी लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवार बदलत नवा ट्विस्ट आणला. 

 

 

यापूर्वी वंचितने परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता त्यांच्याजागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबराव डख यांनी गुरुवारी परभणीतून वंचितचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला. परभणीत महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर हे रिंगणात आहेत. आता पंजाबराव डख या निवडणुकीत त्यांच्यासमोर कितपत आव्हान निर्माण करु शकणार, हे पाहावे लागेल.

 

 

वंचितने किती उमेदवार बदलले?
वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत १९ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांनी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. 

Advertisement

Advertisement