Advertisement

भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल- विजय वडेट्टीवार

प्रजापत्र | Wednesday, 03/04/2024
बातमी शेअर करा

देशातील शेतकरी, कामगार, युवक, नोकरदार वर्ग व सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यामुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असून आता विरोधकांना संपविण्याचा डाव आखला जात आहे. खते, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅस यात प्रचंड दरवाढ व जीएसटी च्या माध्यमातून जनतेची लूट केली जात आहे. सरकार विरुद्ध आता पेटून उठून देशातील संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. देश सुरक्षित नाही, देशातील महिला सुरक्षित नाही, अशी अवस्था देशाची झाली आहे. विद्यमान खासदार अशोक नेते हे संसदेत मौन धारण करून बसतात अशा मौनीबाबाला उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार देतात ही हास्यास्पद बाब आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

 

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ चामोर्शी येथे आयोजित सभेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते.

 

 

स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल

 

देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क व जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. सध्याच्या केंद्रातील मनुस्मृति विचारांचे सरकारने देशातील नागरिकांची लूट करुन, धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करत आहे. व्यापारी हित जोपासत आहे. देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेल्या पवित्र संविधान पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून जगावे लागेल, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.दरम्यान, देशातील भाजपा सरकार हे आदिवासी, शेतकरी, कामगार, युवक विरोधी सरकार असून देशाच्या शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही. पेपर फुटीमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. सरकार कारवाईकडे पाठ फिरवित आहे. देशात तानाशाही सुरु असून पक्ष आणि कुटुंब फोडले जात आहेत, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
 

Advertisement

Advertisement