Advertisement

संपादकीय अग्रलेख - भावानेच दाखविला आरसा

प्रजापत्र | Wednesday, 20/03/2024
बातमी शेअर करा

 श्रीनिवास पवार जे काही म्हणाले ती खरेतर महाराष्ट्राची जनभावना आहे. शरद पवार यांच्या राजकीय भूमिकांबद्दल वेगळे मतप्रवाह असू शकतात, मात्र शरद पवारांसारख्या उंचीच्या राजकीय व्यक्तीबद्दल , त्यापलीकडे जाऊन कुटुंबप्रमुखाबद्दल अजित पवार जे काही बोलत होते , ते कोणालाच पचणे तर दूर , रुचणारे देखील नव्हते.पण अजित पवारांना याबद्दल सुनावायचे कोणी ? ते काम स्वतः अजित पवारांच्या बंधूंनीच केले हे एका अर्थाने बरेच झाले. सोनारानेच कान टोचले पाहिजेत हे जसे सांगितले जाते , तसे आता बंधूंनीच आरसा दाखविल्यानंतर त्याला किमान राजकीय विरोधातून वक्तव्य केले असे तर म्हणता येणार नाही.

 

 

अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होत जी राजकीय भूमिका घेतली, त्याला परिस्थितीची गरज म्हणून किंवा ’उद्याचे काय ’ म्हणून भलेही अनेकांनी पाठिंबा दिला असेल, अनेकजण सत्तेच्या विरोधात जाऊन व्यवस्थांचे ’शुक्लकाष्ठ ’ मागे नको म्हणून जुलमाचा का होईना ’राम राम ’ करीत अजित पवारांसोबत गेले असतीलही , पण महाराष्ट्राच्या जनमाणसाला अजित पवारांची भूमिका रुचली नव्हती . त्यातही अजित पवार गटाचे नेते शरद पवारांवर ज्या टीका करीत होते त्या अश्लाघ्य म्हणाव्या अशाच होत्या. इतर नेत्यांचे एकवेळ ठीक, पण स्वतः अजित पवार यांचे काय? महाराष्ट्रात राजकारण आणि नातेसंबंध वेगळे ठेवण्याची एक परंपरा होती पण अजित पवारांनी त्या परंपरेलाही हरताळ फासला. शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा पुढे करत अजित पवार जे काही बोलत गेले किंवा आजही बोलत आहेत ते कोणत्याही सुसंस्कृत म्हणवणार्‍या राजकारणी व्यक्तीलाच नव्हे तर अगदी सामान्यांना देखील पटणारे नाही. ज्या शरद पवारांच्या आश्रयाला जावूनच अजित पवारांनी इतकी राजकीय उंची गाठली त्या शरद पवारांना सोडण्यासाठी जी बहाणेबाजी अजित पवार करत आहेत ती कोणालाच आवडणारी नव्हती पण अजित पवार पडले मोठे नेते, इतर कोणत्या राजकीय पक्षातील नेत्याने त्याबद्दल वक्तव्य केले तर लगेच राजकीय विरोधातून बोलत आहेत असे म्हणायला अजित पवार तयार आहेतच आणि शरद पवारांसोबतच्या राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याने काही बोलायची हिंमत केली असती तर त्यालाही अजित पवार वेगळ्याच शब्दात बोलले असते.

 

 

पण आता महाराष्ट्राची जनभावना बोलून दाखवायला स्वतः अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार पुढे आले. खरेतर पवार कुटूंबातील एक सुसंस्कृतपणा जो मागच्या तीन पिढ्यांनी जपला आहे, त्या सुसंस्कृतपणाचेच प्रदर्शन श्रीनिवास पवार यांनी केले असे म्हणावे लागेल.
श्रीनिवास पवार बोलले ते बरेच झाले पण त्यापलिकडे जावून आज राज्यात गावागावातले वास्तव काय आहे हे एकदा अजित पवारांनी अनुभवायला हवे. सत्तेसाठी म्हणून किंवा सत्तेचे लाभ घेण्यासाठी म्हणून भलेही सध्याचे लोकप्रतिनिधी अजित पवारांसोबत आले असतील पण शरद पवारांना या वयात दिलेली दुषणे सामान्य माणसाला आवडलेली नाहीत. भाजपने ज्या पद्धतीने ही फोडाफोडी केली ती देखील जनसामान्यांना रूचलेली नाही. निवडणुक आयोगाचा वापर करून भलेही अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष पळविला असेल पण त्यांच्या घड्याळ्याची टीकटीक कोणत्याही क्षणी सर्वोच्च न्यायालय बंद करू शकते अशी परिस्थिती आहे.देशाच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चिन्हाचा वापर करताना ‘न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून’ असे लिहीण्याची वेळ एखाद्या राजकीय पक्षावर आली असेल. महासत्तांचा वापर करून काही तात्कालिक निर्णय आपल्या बाजूने पदरात पाडले जावू शकतात पण जनभावना आणि सारेच कायदे, सार्‍याच व्यवस्था सत्तेपुढे झुकणार्‍या नसतात याची जाणीव आतातरी अजित पवारांनी स्वतःला करून घ्यावी.

Advertisement

Advertisement