Advertisement

प्रजापत्र अग्रलेख- महाशक्तीलाही हादरे बसू शकतात

प्रजापत्र | Wednesday, 13/03/2024
बातमी शेअर करा

भाजप हा सध्या देशातील सर्वशक्तिमान पक्ष बनला आहे. देशात विरोधीपक्ष नावाचा काही प्रकार औषधालाही शिल्लक राहू नये अशा मानसिकतेतून भाजपचे सारे वर्तन सुरु आहे आणि भाजपमध्ये देखील मोदी आणि शहा म्हणतील तेच, त्यांच्या विरोधात कोणी जाणारच नाही असे जे वातावरण निर्माण झाले आहे, त्या वातावरणाला देखील अपवाद निर्माण होऊ शकतात हे आता भाजपमध्ये दिसायला लागले आहे. हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांना द्यावा लागलेला राजीनामा असेल किंवा महाराष्ट्रात सुरु असलेली धुसफूस, अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायला दिलेला नकार, महाशक्ती म्हणवणारांना देखील हादरे बसू शकतात हेच दाखविणारा आहे.

 

मागच्या काही काळात विरोधी पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये नेतृत्वाचे कारण पुढे करून तेथील सरकार अस्थिर करायचे आणि त्यातून मग ऑपरेशन लोटस राबविता येते का याचे प्रयोग करायचे हा जणू भाजपच्या राजकारणाचा भाग झालेला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपने हा प्रयोग राबविला. त्याचे अगदी ताजे उदाहरण हिमाचलप्रदेशमध्ये पाहायला मिळालेच आहे. येथील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यात कोणाचा हात आहे, किंवा कोणती 'महाशक्ती ' यात गुंतलेली आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. भाजपची राजकीय शक्तीच इतकी वाढली आहे आणि साऱ्याच स्वायत्त म्हणवणाऱ्या संस्था बटीक बनवून त्यांचा वापर करून कोठे काहीही करू शकतो हेच भाजपने साऱ्या देशाला दाखविले आहे. भाजपने म्हणण्यापेक्षाही मोदी शहा जोडीने एकूणच देशाच्या राजकीय पातळीवर स्वतःची अशी काही दहशत बसविलेली आहे की विरोधी पक्ष तर सोडाच , पण स्वतः स्वतः भाजपमधले देखील काही अपवाद वगळले तर कोणी या जोडीच्या विरोधात उघडतर दूरच, दबक्या आवाजात देखील बोलू शकत नाही असे चित्र होते, आहे.
मात्र राजकारणात कोणतीच परिस्थिती सदा सर्वकाळ कायम नसते . त्यात बदल होत असतात . सत्ता कितीही क्रूर , पाताळयंत्री , खुनशी आणि हटवादी असली तरी त्याला कधी ना काही विरोध व्हायला सुरुवात होत असतेच. अशा महासत्तेला देखील हादरे कधीतरी बसत असतातच, फक्त त्याची वेळ यावी लागते . आता भाजपमध्येही त्याची सुरुवात होताना दिसत आहे. हरियाणामधील भाजपच्या सरकारचे जे काही झाले, मनोहरलाल खट्टर यांना निवडणुकीच्या तोंडावर जो राजीनामा द्यावा लागला आणि तडकाफडकी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली याचा अर्थ भाजपमध्ये देखील सारे काही आलबेल आहे असे नाही. या पक्षात देखील अस्वस्थता आहेच आणि कधी ना कधी ती बाहेर पडणार आहेच याचीच ही  झलक आहे.
हरियांचेच कशाला , इतर  ठिकाणीही कोठे कोठे असेच काही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घेतले तर जो भाजप मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार , चारशेपार जागा मिळणार हे छातीठोकपणे सांगत आहे, त्या भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायला नारायण राणे असतील किंवा विनोद तावडे , गिरीश महाजन असे बडे नेते नकार देत आहेत किंवा कानकुन करीत आहेत . उद्या पक्षाचा आदेश अंतिम आलाच तर यांना उभे राहावे लागेल देखील कदाचित, पण आपली अस्वस्थता हे नेते जाहीर करताना दिसत आहेत. सुजय विखे जे काही बोलून गेले ते देखील दुर्लक्ष करण्यासारखे नाही  आणि जोडीला राज्यातील महायुतीमध्ये देखील सारे काही आलबेल नाही. आज भलेही कोणी थेट बंद करण्याची धमक दाखविणार नाही, पण कहायुतीमधील इतर पक्षांना भाजपच्या भूमिकेमुळे गळती लागेल हे नक्की . आणि आज ना उद्या त्याचे परिणाम जाणवतीलच. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ ४ जागा दिल्या जाणार असल्याचे संकेत आहेत, मग त्यांचा पक्ष महाराष्ट्रवादी तरी कसा राहणार आहे? आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सहन होणार आहे का ? शिंदे गटाचे काही उमेदवाराच बदलायचा प्रयत्न भाजप करीत आहे, मग याच साठी ठाकरेंना सोडून आपण शिंदेंसोबत आलो होतो का , या कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे शिंदेंना तरी किती शक्य होईल ? आणि या साऱ्या नाराजीचे परिणाम महाशक्तीलाही हादरे बसू शकतात हे दाखविणारा असेल. 

 

Advertisement

Advertisement