Advertisement

आता 'माजींची काळजी घ्या' म्हणत

प्रजापत्र | Saturday, 09/03/2024
बातमी शेअर करा

बीड दि. ९ (प्रतिनिधी ) : बीड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार असून माजी मंत्री पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत . या पार्श्वभूमीवर आता खुद्द पंकजा मुंडे यांनीच लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

 

शिरुरकासार तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना सर्व ‘आजी’ लोकांनी ‘माजी’ लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमच्या ‘आजी’ होण्यामध्ये माझा थोडा तरी खारीचा वाटा आहे. पण आता चार दिवसांत आचारसहिंता लागेल, त्यामुळे आता काय काळजी घ्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काळजी लोकसभेची घ्या, मग पुढची काळजी आम्ही घेऊ”, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे त्या आता लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे मानले जात आहे. पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यातील शिरूरमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “मी देखील माजी पालकमंत्री आहे. त्यावर माजी ग्रामविकास मंत्री आहे. येथे बसलेले सुरेश धस आणि आमदार बाळासाहेब आजबे हे आज सत्ताधारी आहेत. मला कोणी-कोणी माजी केलं, हे मी बोलू शकत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. मंचावर बसलेले नेते आज सत्ताधारी असले तरी मी मात्र माजी झाले. त्यामुळे मला तुम्हाला (जनतेला) काही थेट सांगता येईना. ‘आजी’-‘माजी’ आमदारांना माझी काळजी घ्या, असा सल्लाही दिला. “सर्व ‘आजी’ लोकांनी ‘माजी’ लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमच्या ‘आजी’ होण्यामध्ये माझा थोडा तरी खारीचा वाटा आहे. पण आता चार दिवसांत आचारसहिंता लागेल, त्यामुळे आता काय काळजी घ्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काळजी लोकसभेची घ्या, मग पुढची काळजी आम्ही घेऊ असे पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड लोकसभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे असतील आणि मी बहिणीचा हक्क मारणार नाही असे आतापर्यंत पंकजा मुंडे म्हणत होत्या. मात्र भाजपकडून उमेदवार बदलला जाईल आणि पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. यावर आता प्रथमच आडवळणाने का होईना माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीच भाष्य केल्याने त्यांनी लोकसभेचे स्पष्ट संकेत दिल्यानेच मानले जात आहे.

Advertisement

Advertisement