Advertisement

बीडच्या एलसीबीत होणार फेरबदल !

प्रजापत्र | Saturday, 09/03/2024
बातमी शेअर करा

बीड दि.९ (प्रतिनिधी)-निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतरही काही बदलीपात्र पोलीस अधिकाऱ्यांना अभय देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर आता बीड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.बीडच्या एलसीबीचे प्रमुख असलेल्या पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची बदली कोणत्याही क्षणी होणार असल्याची माहिती असून त्यांची जागा घेण्यासाठी सध्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर रस्सीखेच सुरु झाली आहे. 
    निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नसल्याचे प्रकरण राज्यस्तरावर चर्चेत आले होते.त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशांप्रमाणे जिल्ह्यात तीन वर्ष सेवा झालेल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.मात्र बीड जिल्ह्यात एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख असलेल्या पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना मात्र बदलीपात्र असूनही बदलीपासून अभय देण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.मुळातच जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी संतोष साबळे यांच्यावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते,त्यातच काही गुन्ह्यांच्या तपासाच्या संदर्भाने साबळे यांनी परळीकरांची देखील नाराजी ओढवून घेतल्याची चर्चा होती.त्यामुळे या सर्वच नाराजांना साबळेंच्या विरोधात 'वंचित' ने केलेल्या तक्रारींमुळे अधिकच बळ मिळाले.त्यातच विशेष पोलीस महानिरीक्षकांनी देखील 'सारे काही पारदर्शी करा' असे बजावल्यामुळे संतोष साबळे यांच्या बदलीच्या हालचालींनी वेग घेतल्याची माहिती आहे.शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही पोलीस अधीक्षकांनी आपल्या कक्षात आस्थापना कर्मचाऱ्यांसोबत दीर्घकाळ चर्चा देखील केली.त्यामुळे तर साबळे यांच्या बदलीचा प्रस्ताव गेल्याचे अधिकच जोरात बोलले जाऊ लागले आहे. 
दरम्यान संतोष साबळे यांच्या बदलीचे आदेश अद्याप आले नसले तरी या पदावर येण्यासाठी अनेकांनी लॉबिंग सुरु केली आहे.आपल्याला शक्य असेल तेथून एलसीबीसाठी आपणच कसे 'पात्र' आहोत आणि सारे 'निकष' पूर्ण करण्याची कशी तयारी आहे याचे संदेश पोहचविले जात आहेत.पोलीस निरीक्षक केतन राठोड, मुकुंद कुलकर्णी,शीतलकुमार बल्लाळ,हरिभाऊ खाडे, अशोक मुदिराज यांच्यासोबतच नव्यानेच जिल्ह्यात आलेले प्रवीण बांगर हे सर्वच अधिकारी एलसीबीमध्ये यायला इच्छुक असून आपापल्या मार्गाने जोर लावीत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे या रस्सीखेचीमध्ये आता कोणाचे 'बळ' जास्त ठरते आणि वैद्यनाथाचा आशीर्वाद कोणाला मिळतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

 

Advertisement

Advertisement