Advertisement

सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा खून

प्रजापत्र | Saturday, 09/12/2023
बातमी शेअर करा

कडा - दोन दिवसांपूर्वीच एका अट्टल दरोडेखोराचा भोसले व काळे गँगने चाकूने भोसकून व दगडाने ठेचून खून केला होता. यातील आरोपी अटक होत नाहीत तोच पुन्हा पैशाच्या वादावरून दोन सख्या भावांत वाद झाला. यात सैनिक असलेल्या मोठ्या भावाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका दराेडेखोरानंतर तिसऱ्याच दिवशी सैनिकाचा खून झाल्याने आष्टी हादरले आहे.

 

प्रवीण विनायक पवार (वय ३९ रा.वाघळूज ता.आष्टी) असे मयताचे नाव आहे. प्रवीण हे झारखंड येथे सीआरपीएफ मध्ये नोकरीला असून मागील पंधरा दिवसांपासून सुट्टीवर गावी आले होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यात प्रवीणला बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू मारहाणीत जखम झाल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

 

या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळाचाही पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांच्या फिर्यादीवरून सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजयी सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहेत.

Advertisement

Advertisement