Advertisement

शिष्यवृतीच्या अर्जाची मुदत संपत आली तरी लागेना परीक्षेचा निकाल

प्रजापत्र | Wednesday, 23/12/2020
बातमी शेअर करा

विद्यापीठाच्या अनागोंदीचा विद्यार्थ्यांना फटका.

समीर लव्हारे

बीड  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि परीक्षा मागील वर्षभरापासून गोंधळाचे समीकरणे बनले आहे. सध्या राजश्री शाहू महाराज आणि इतर शिष्यवृत्तीधाराकांसाठी अर्ज करण्याची 31 डिसेंबर अंतिम तारीख असून अर्ज करण्यासाठी मागील वर्षाच्या निकालाचे गुणपत्रक गरजेचे आहे. मात्र विद्यापीठाने अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक विद्यापीठाच्या ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड केली नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण आता झाला आहे. विद्यापीठाच्या अनागोंदीचा त्रास मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. 
कोरोना विषाणूमुळे राज्य सरकारने सुरुवातीला विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा घाटा घातला. मात्र युजीसी आणि न्यायालयाने परीक्षा बंधनकारक असल्याचा आदेश दिल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षाची औपचारिकता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.या विद्यापीठाने परीक्षेसाठी कोणतेही नियोजन केले नव्हते हे कालांतराने स्पष्ट झाले.विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा पर्याय देण्यात आला मात्र अनेकांना प्रवेशपत्र मिळाले  नाहीत. ज्यांना मिळाले त्यातील बहुतांश जणांना परीक्षा केंद्रावर जावूनच परीक्षा द्याव्या लागल्या. एकंदरीत या सगळ्या गोंधळात विद्यार्थी भरडला गेला. दरम्यान ज्याला जसं जमेल तसं त्या विद्यार्थ्याने परीक्षा दिली मात्र निकालाची वेळी पुन्हा नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न असा प्रकार सुरु झाला. आज बी.ए.,बी.एस.सी.च्या विद्यार्थांचा निकाल लागला, मात्र अनेक विद्यार्थांच्या गुणपत्रकावर आर. आर.असे दाखविण्यात येत आहे.तर बीए.एम.सी.जे,बी.कॉमच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले नसून या सर्व विदयार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरायचा हा यक्ष प्रश्न आहे.31 डिसेंबरला अर्ज करण्याची अंतिम तारीख असून 25 डिसेंबरपर्यंत महाविद्यालयांनी अर्ज मागविले आहेत.

समन्वयाचा अभाव
विद्यापीठ आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव मागील वर्षभरात वेळोवेळी दिसून आला.शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना जी डेडलाईन देण्यात आली ते वाढविणे गरजेचे आहे.कारण ‘नौकरभरती करायची मात्र उमेदवार एजबार झाल्यावर’ असाच हा प्रकार आहे. विद्यापीठाने निकालाबाबतची सर्व माहिती शासनाला देऊन 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळवून घ्यावी ज्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही.
- नामदेव सानप (प्राचार्य,वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय बीड)

 

 हेही वाचा 

Advertisement

Advertisement