Advertisement

वाहन चोरीचे वाढले प्रकार

प्रजापत्र | Tuesday, 16/05/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - बीड जिल्ह्यातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांनी वाहन धारकांची झोप उडाली असून, दुचाकी चोरीच्या घटनासह आता चार चाकी वाहनेही चोरीला जात आहेत. सध्या ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही वाहन चोर पोलीसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

बीड जिल्ह्यात मागील काही काळापासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी दुचाकी चोर पोलीसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून अनेक चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तरीही दुचाकी चोरीच्या घटना काही थांबलेल्या नाहीत उलट यात आता चार चाकी वाहन चोरीच्या घटनांची भर पडली आहे. जवळपास एक ते दीड महिन्यापूर्वी आडस येथून एक माल वाहतूक रिक्षा चोरीला गेला. यानंतर दिंद्रुड येथूनही कापूस भरलेला रिक्षा चोरीला गेला. रविवारी ( दि. १४ ) रात्री ११ ते सोमवार ( दि. १५ ) सकाळी ६ च्या आत अंबाजोगाई शहरातील गजराई नगर नागझरी परिसरातून शिक्षक कैलास आकुसकर यांची घरासमोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर कार क्र. एम.एच. १२ के एन ७४८८ दरवाज्याची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी कार पार्क करून लॉक लाऊन झोपी गेले सकाळी उठून शाळेवर जाण्यासाठी कार आणण्यासाठी गेले असता सदरील ठिकाणाहून कार गायब होती. त्याठिकाणी काचाचे तुकडे पडलेले दिसून आले. यावरून कार चोरी झाल्याचे समजले. याप्रकरणी कैलास नरहरी आकुसकर यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

Advertisement